एफएटीएफमुळे पाकिस्तान दबावात ः दहशतवाद्याला अटक करण्याची तालिबानला सूचना
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
इंटरनॅशनल वॉचडॉग ‘फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स’ने (एफएटीएफ) पाकिस्तानला स्वतःच्या ग्रे लिस्टमध्ये सामील केले आहे. या कारवाईनंतर दबावामुळे पाकिस्तानला आता दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलत असल्याचे दाखविणे भाग पडले आहे. पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचा शोध लावणे आणि त्याला ताब्यात घेण्यासाठी तालिबान राजवटीशी संपर्क साधला असल्याचे समजते.
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर हा भारतातील 2001 मधील संसदेवरील हल्ला तसेच 2019 मधील पुलवामा आत्मघाती स्फोटासाठी जबाबदार असल्याचे तालिबानला लिहिलेल्या पत्रात पाकिस्तानकडून म्हटले गेले आहे. मसूद अझहर हा अफगाणिस्तानातील नांगरहार आणि कुनार प्रांतात लपलेला असू शकतो, त्याला अटक करण्यात यावी, असे पाकिस्तानने तालिबानला पत्राद्वारे सांगितले आहे.
दहशतवादी मसूद अझहर हा अफगाणिस्तानात कधी पोहोचला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यावर तो तेथे पोहोचला असल्याचे मानले जात आहे. तर याप्रकरणी पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाकडून कुठलीच अधिकृत टिप्पणी करण्यात आलेली नाही. एससीओ परिषदेपूर्वी पाकिस्तान जागतिक समुदायाचे लक्ष विचलित करू पाहत असल्याचेही मानले जात आहे. मसूद अझहरला संयुक्त राष्ट्रसंघानेच दहशतवादी घोषित केलेले आहे.
तर दुसरीकडे मसूद अझहरने पाकिस्तानी सोशल मीडिया नेटवर्कवर पोस्ट लिहिणे सुरूच ठेवले आहे. मसूद अझहरने स्वतःच्या पोस्ट्समध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना कारवायांमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. तालिबानचा विजय मुस्लिमांच्या विजयासाठी आणखी अनेक दरवाजे उघडणारा ठरणार असल्याचे मसूदने म्हटले आहे.
तालिबानचा इन्कार
तालिबानने पाकिस्तानकडून अशाप्रकारचे पत्र मिळाले नसल्याचा दावा केला आहे. अफगाणिस्तानात मसूद अझहर असल्याबद्दल आम्हाला कुठलीच माहिती नाही. आमच्या देशात राहून अन्य देशाच्या विरोधात कट रचणाऱया व्यक्तीचे आम्ही समर्थन करत नसल्याचा दावा तालिबान राजवटीचे संयुक्त राष्ट्रसंघातील प्रतिनिधी सुहैल शाहीन यांनी केला आहे.