जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्याला मोठा झटका
वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानात आणखी एका दहशतवाद्याची हत्या झाली आहे. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मौलाना तारिक रहीम उल्लाह तारिकला ठार केले आहे. भारतविरोधी रॅलीत सहभागी होण्यासाठी जात असताना तारिकची हत्या करण्यात आली आहे. कराचीमध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. तारिक हा पाकिस्तानातील प्रसिद्ध मौलाना होता, त्याचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येत लोक जमायचे.
कराचीच्या ओरंगी टाउनमध्ये भारतविरोधी सभेचे आयोजन करण्यात आले होते. याच सभेत सामील होण्यासाठी जात असताना तारिकची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेला टार्गेट किलिंग संबोधिले आहे. अलिकडेच लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अकरम खान उर्फ अकरम गाझीची खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बजौरमध्ये हत्या करण्यात आली होती. अकरमची हत्या आयएसआयसोबत लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.
गाझी हा लष्कर-ए-तोयबासाठी भारतविरोधी कारवायांकरता सर्वात महत्त्वपूर्ण दहशतवादी होता. अकरम गाझी हे भारताविरोधात खोऱ्यातील युवांना चिथावणी देण्याचे काम करायचा. आतापर्यंत अज्ञात हल्लेखारोंच्या टार्गेट लिस्टमध्ये लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी राहिले होते. परंतु तारिकच्या हत्येमुळे आता जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी देखील मारले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मार्च महिन्यात हिजबुल मुजाहिदीनच्या कमांडरची पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती. त्यापूर्वी फेब्रुवारीमध्ये अज्ञात बंदुकधाऱ्यांनी कराची येथे अल-बद्र मुजाहिदीनचा माजी कमांडर सैयद खालिद रझाची गोळ्या घालून हत्या केली होती. तर जानेवरी महिन्यात इस्लामिक स्टेटचा टॉप कमांडर आणि काश्मिरी दहशतवादी ऐजाज अहमद अहंगरची अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात हत्या झाली होती.