क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना आयोजित केलेल्या भव्य कुस्ती मैदानातील प्रमुख कुस्तीत भूपेंद्र सिंग अजनालाने 22 व्या मिनिटाला महाराष्ट्राचा अव्वल मल्ल महान भारत केसरी माऊली जमदाडेला झोळी डावावर चीत करून बेळगाव केसरी किताब मिळविला. दुसऱया क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्राच्या सिकंदर शेखने प्रदीप सिंगला दुहेरी पटावर आस्मान दाखवून दर्शन केसरी किताब पटकावत उपस्थित 25 हजारहून अधिक कुस्ती शौकिनांची मने जिंकली.
प्रमुख कुस्ती जॉर्जियाचा जॉर्जी याला दुखापत झाल्याने त्याच्या जागी महान भारत केसरी माऊली जमदाडे व पंजाबचा हिंदकेसरी भूपेंद्र सिंग ही कुस्ती जयरथ जगजंपी, गजानन धामणेकर, श्रीकांत देसाई, सतीश पाटील, आर.एल. चौगुले, किरण गावडे बेळगाव जिल्हा कुस्ती संघटनेच्या सभासदांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱयाच मिनिटाला माऊली जमदाडेने दुहेरीपट काढून भूपेंद्र सिंगला खाली घेवून त्याच्यावर ताबा मिळविला. त्याला घिस्साची पकड घेवून फिरविण्याचा प्रयत्न केला पण त्यातून भूपेंद्रने सुटका करून घेतली. सातव्या मिनिटाला माऊलीने एकेरीपट काढून खाली घेत कब्जा मिळविला पण खालून डंकी मारून भूपेंद्रने माऊलीवर ताबा मिळविला. माऊलीने त्यातून सुटका करून घेतली. 15 व्या मिनिटाला माऊलीने एकेरीपट काढत पुन्हा भूपेंद्रला खाली घेत खालून दसरंग मारून माऊलीवर ताबा मिळविला. 20 व्या मिनिटाला माऊली जमदाडेने दुहेरीपट काढून बॅकथ्रो मारून घिस्सावर फिरविण्याचा प्रयत्न केला पण ताकदीने भक्कम असलेल्या भूपेंद्रला फिरविणे शक्य झाले नाही. त्यामुळे माऊलीने झोळी बांधून भूपेंद्रला चीत करण्याचा प्रयत्न करताना त्यालाच तो डाव अंगलट आला. आपल्या हुशारीने भुपेंद्रने, माऊलीने मारलेल्या झोळीवर माऊलीला दाबून झोळी डावावर चीत केले. हा निर्णयावर काही वेळ वाद झाला. पण स्क्रीन टीव्हीवर कुस्तीची फीत पाहून निकाल जाहीर करून भूपेंद्र सिंगला विजयी घोषित करण्यात आले. त्याला मान्यवरांच्या हस्ते बेळगाव केसरी किताब देण्यात आला.
दुसऱया क्रमांकाची भारत केसरी सिकंदर शेख गंगावेस व प्रदीप सिंग पंजाब ही कुस्ती दर्शन ग्रुपचे संचालक श्रीकांत देसाई यांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत 12 व्या मिनिटाला सिकंदर शेखने दुहेरीपट काढून प्रदीप सिंगला खाली घेतले पण प्रदीपने सुटका करून घेतली. 15 व्या मिनिटाला सिकंदर शेखने पटात घुसून प्रदीपला न कळत दुहेरीपटावर नेत्रदीपक विजय मिळवून कै. कॅप्टन बाळकृष्ण देसाई यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेला दर्शन केसरी हा किताब मिळविला.
तिसऱया क्रमांकाची कुस्ती हरियाणा केसरी विशाल हरियाणा व विशाल बनकर महाराष्ट्र केसरी ही कुस्ती लोकमान्य सोसायटीचे पदाधिकारी गजानन धामणेकर, कॅ. नितीन धोंड, किरण गावडे व कुस्तीचे आश्रयदाता सतीश पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत एकेरीपट काढून विशाल बनकरला खाली घेत एकलांगी भरण्याचा प्रयत्न केला असता त्यात विशाल बनकरला गंभीर दुखापत झाल्याने ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.
चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत सेनादलचा आंतर सुवर्णपदक विजेता सुशांत तांबोळकर व सिना इराण ही कुस्ती मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. सेनादलच्या सुशांतने एकेरीपट काढून सिना इराणवर ताबा मिळविला. पण सिना इराणने सुटका करून घेतली. दुसऱया मिनिटाला सुशांतने सांधी काढून घिस्सा डावावर प्रेक्षणीय विजय मिळविला. पाचव्या क्रमांकाची कुस्ती अमीत कारंडे कोल्हापूर याने संगमेश बिराजदारचा दसरंग फिरवून नेल्सन डावावर विजय मिळविला. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत शिवानंद नर्वानट्टी मोतीबाग यांनी विक्रांत सिंग पंजाबवर लपेट डावावर विजय मिळविला. सातव्या कुस्तीत कलीम मुलानीने पवन चिकदिनकोपचा घिस्सा डावावर विजय मिळविला. आठव्या क्रमांकांची कुस्ती गजानन निर्वानट्टी व हणमंत गदीगवाड वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आली. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत किर्तीकुमार कारवे कंग्राळी याने मारूती तरन्नळीवर एकलांगीवर विजय मिळविला.
आकर्षक कुस्तीत कुमार तळवार रामदुर्गने पार्थ पाटील कंग्राळीचा गुणांवर विजय मिळविला. विक्रम शेनोळीने बॅक थ्ा्राs, दयानंद घटप्रभाने घिस्सावर, बाळू शिंदीकुरबेटने एकचाकवर, विकास अकलंगीने घिस्सावर पराभव केले. सिद्धाप्पा दळवाई, किसन चौगुले, गणेश सरवनकर, ओंकार मुतगा, करण खादरवाडी, सौरभ तुर्केवाडी, रवी पाटील तुर्केवाडी यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविला.
आखाडय़ाचे पंच म्हणून ऑलिंपिकपटू एम.आर.पाटील, राम पवार,लक्ष्मण पवार, बाळाराम पाटील, आप्पया अप्पन्नावर, सुधीर बिर्जे, जोतिबा हुंदरे, ए.जी. मतुर्गी, किसन पाटील. प्रशांत पाटील, मालोजी येळ्ळूर, आदीनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन सुकुमार माळी तर हलगी वादन कुरंदवाडचे श्रीकेतन आवळे यांनी केले. मैदान यशस्वी करण्यासाठी बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.