पोलंडवर 3-1 ने मात करून उपांत्यपूर्व फेरीत, गिरोडचा विक्रम
वृत्तसंस्था/ दोहा
विश्वचषक स्पर्धेतील रविवारी झालेल्या सामन्यात कीलियन एम्बापेच्या चमकदार खेळाच्या जोरावर फ्रान्सने पोलंडचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करून शेवटच्या आठ संघांत स्थान मिळविले. एम्बापेने प्रथम ऑलिव्हियर गिरोडला ऐतिहासिक गोल नोंदवण्यास मदत केली आणि नंतर स्वतः दोन शानदार गोल नोंदवत संघाला यश मिळवून दिले.
फ्रान्सने प्रारंभापासून आक्रमक खेळ केला. पण मध्यंतराच्या सुमारापर्यंत त्यांना पोलंडचा भक्कम बचाव भेदण्यात यश आले नाही. 44 व्या मिनिटाला एम्बापेने अचूक थ्रू पास पुरविल्यानंतर गिरोडने जोरदार फटक्यावर गोल नोंदवला. गोलरक्षक वोसीच स्केसनीने डाईव्ह मारला. पण त्याला तो अडविता आला नाही. गिरोडचा हा 117 व्या सामन्यातील 52 वा विक्रमी गोल होता. फ्रान्सतर्फे सर्वाधिक गोल नोंदवणाऱया थिएरी हेन्रीचा 51 गोलांचा विक्रम त्याने मागे टाकला. हेन्रीने 123 सामन्यांत हा विक्रम नोंदवला होता.
उत्तरार्धातही फ्रान्सने आक्रमक खेळ सुरूच ठेवला. गिरोडने दुसरा गोल नोंदवलाच होता. पण ज्युल्स कुंडेच्या क्रॉसला त्याने फ्लिक केले. पण तो फटका बारजवळून बाहेर गेला. 74 व्या मिनिटाला एम्बापेने मात्र संघाची आघाडी दुप्पट केली. पोलंडच्या बॉक्सजवळून जोरदार फटक्यावर गोलरक्षक स्केसनीला भेदत त्याने हा गोल नोंदवला. नंतर स्टॉपेज टाईममध्ये 91 व्या मिनिटाला त्यानेच आणखी एक गोल नेंदवला. पेनल्टी क्षेत्रात थुरमने दिलेल्या पासवर त्याने गोलपोस्टच्या टॉप कॉर्नरवर शक्तिशाली फटका मारत हा गोल नोंदवला. सर्वाधिक गोल नोंदवणाऱया या स्पर्धेतील खेळाडूंत तो आघाडीवर असून त्याने चार गोल नोंदवले आहेत. त्याने भाग घेतलेल्या वर्ल्ड कपमधील 11 सामन्यांत एकूण 9 गोल नोंदवले आहेत. फ्रान्सच्या जस्ट फॉन्टेनने सर्वाधिक 13 वर्ल्ड कप गोल नेंदवले आहेत. त्यानंतर 99 व्या मिनिटाला पोलंडला मिळालेल्या पेनल्टीवर लेवान्डोवस्कीने पोलंडचा एकमेव गोल नोंदवला. फ्रान्सच्या खेळाडूने चेंडू हाताळल्याने त्यांना ही पेनल्टी मिळाली होती.
ब्राझीलने 60 वर्षापूर्वी जेतेपद स्वतःकडेच राखण्याचा पराक्रम केला होता. विद्यमान विजेत्या असलेल्या फ्रान्सनेही उपांत्यपूर्व फेरी गाठत त्याच दिशेने आगेकूच केली आहे.