जिल्ह्यातील 14 लाख जनावरांना लस देण्याचे उद्दिष्ट : 31 जानेवारीपर्यंत मोहीम पूर्ण , जि. पं. कार्यालयात बैठक
प्रतिनिधी /बेळगाव
जनावरांना लाळ्याखुरकतची लागण होवू नये यासाठी प्रतिबंधक लस मोहीम राबविण्यात येणार आहे. 5 जानेवारीपासून ही मोहीम राबविण्यात येणार असून, 13 लाख 97 हजार 711 जनावरांना ही लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पल्सपोलिओ लस मोहिमच्या धर्तीवरच ही मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी दिली.
जिल्हा पंचायतच्या सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यामध्ये गायी, बैल, म्हैस यांची संख्या 14 लाखांच्या आसपास आहे. लसीकरण करण्यासाठी 964 जणांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी 482 लसीकरण पथक तयार करण्यात आली आहेत. एकूण जिह्यामध्ये 10 हजार 641 ब्लॉक करण्यात आले आहेत, अशी माहिती पशु वैद्यकीय उपसंचालक डॉ. राजीव एन. कुलेर यांनी दिली.
दररोज प्रत्येक ब्लॉकमध्ये 100 ते 120 जनावरांना लस देण्यात येणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी जनावरांना लस टोचून घेवून सहकार्य करावे, असे आवाहन देखील दर्शन एच. व्ही. यांनी केले आहे. कोणत्याही जनावराला औषधाचे रिअॅक्शन झाल्यास त्यावर तातडीने उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे दर्शन एच. व्ही. यांनी स्पष्ट केले. लस झाल्यानंतर प्रत्येक जनावराला टॅब मारण्यात येणार आहे. त्यानंतर दररोज त्याची माहिती ईएनएएफ या पोर्टलवर नोंदविण्यात येणार
आहे. लसीकरण मोहीम वर्षातून दोनवेळा आयोजित केली जाते. मागील वेळी 87 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले होते. यावेळेला 100 टक्के ही मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
लम्पिस्कीनसाठी प्रभावी लस
लम्पिस्कीन आजारामुळे जनावरे दगावली होती. मात्र त्यानंतर प्रभावी लस तयार करण्यात आली असून ती दिली जात आहे. त्यामुळे दगावणाऱ्या जनावरांची संख्या कमी झाली आहे, असे डॉ. राजीव कुलर यांनी बैठकीत सांगितले.
जनजागृती मोहीम पत्रकाचे उद्घाटन
लाळ्याखुरकत लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात करण्यात येणार आहे. यासाठी जिह्यातील संपूर्ण गावांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी पोस्टर व पत्रके तयार करण्यात आली असून त्याचे उद्घाटन जिल्हा पंचायतच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. महेश कोणी, पशुवैद्यकीय विभागाचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर व प्रतिनिधी तसेच केएमएफचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.