विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात टीम इंडिया व ऑस्ट्रेलिया यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना नमविल्याने या दोन तगड्या संघातच आता अंतिम लढत होणार आहे. दोन्ही संघ तोडीस तोड असल्याने हा सामना रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. किंबहुना, आत्तापर्यंतचा परफॉर्मन्स पाहता भारतीय संघाचे पारडे नक्कीच जड म्हणता येईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने सध्या अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या सलामीच्या सामन्यापासून सुरू झालेले भारताचे विजयी अभियान उपांत्य सामन्यापर्यंत कायमच राहिल्याचे दिसते. आता विश्व करंडक केवळ एक पाऊल दूर असल्याने सलग 11 विजयांसह टीम इंडिया त्यावर आपले नाव कोरणार का, याची उत्कंठा शिगेला पोहोचल्याचे पहायला मिळते. वर्ल्ड कपच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाचा संघ कायमच वरचढ राहिलेला आहे. आत्तापर्यंत पाच वेळा वन डेमध्ये या संघाने जेतेपद पटकावले आहे. तर भारताने दोनदा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे. तथापि, आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून, आजमितीला भारतीय संघ जगातील सर्वोत्तम संघ मानला जातो. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने क्रेटमध्ये रोहित सेनेचा ताफा सर्वाधिक प्रभावी असून, मोहम्मद शमी हा अविश्वसनीय गोलंदाज असल्याचे म्हटले आहे. विल्यमसनने दिलेले हे प्रशस्तीपत्रकच बरेच काही सांगून जाते. भारताची सर्वांत जमेची बाजू म्हणजे सांघिक योगदान. संघातील प्रत्येक खेळाडू आपापली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडत आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांवर दडपण टाकण्यात संघ प्रत्येक सामन्यात यशस्वी ठरला आहे. हीटमॅन रोहित हा फलंदाज म्हणून गोलंदाजांकरिता कर्दनकाळ ठरत आहेच. शिवाय कर्णधार म्हणून त्याच्याकडून दाखविण्यात येत असलेले चातुर्यही निर्णायक ठरत असल्याचे पहायला मिळते. अंतिम सामन्याच्या सुऊवातीच्या षटकात ऑस्ट्रेलियाचे मानसिक खच्चीकरण करण्यात भारताचा हा कप्तान प्रमुख भूमिका बजावणार का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल. शुभमन गील हा तर बोलून चालून क्लासिकल फलंदाज. दोन क्षेत्ररक्षकांमधून चेंडू काढणे, ही त्याची खासियत. कधी एकेरी, दुहेरी, तर कधी चौकार, षटकार असा चौरस खेळ करणाऱ्या शुभमनला मागच्या सामन्यात शतकापासून वंचित रहावे लागले. ही उणीव भरून काढण्याची संधी त्याला या महत्त्वाच्या सामन्यात असेल. चेसमास्टर विराट कोहली हे भारताचे प्रमुख अस्त्र होय. या वर्ल्ड कपमध्ये तब्बल 3 शतकांसह 711 धावांचा रतीब घालणारा विराट फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे. न्यूझिलंडविऊद्धच्या सामन्यात 50 वे शतक झळकावत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणाऱ्या विराटने क्रिकेटच्या इतिहासात आता एक नवा अध्याय रचला आहे. खरेतर विराट आणि विक्रम हे एक समीकरणच मानले जाते. त्याच्या विराटत्वापुढे प्रतिस्पर्धी खेळाडूंची कामगिरी अनेकदा खुजी ठरते. स्वाभाविकच फायनलमध्ये विराटला रोखणे, हे कांगारूंपुढचे मोठे आव्हान असेल. श्रेयस अय्यरने आपला तडाखा सर्वांना दाखवून दिला आहे. उपांत्य फेरीत केवळ 70 धावांमध्ये शतक फटकावणारा हा मुंबईकर खेळाडू ऑस्ट्रेलियन गोलंदाजांशी कसा सामना करतो, हे पहावे लागेल. के. एल. राहुलही सध्या उत्तम फॉर्मात आहे. तंत्रशुद्धतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या राहुलकडून पुन्हा एकदा भारताच्या अपेक्षा असतील. सूर्यकुमारने गरजेच्या वेळी संघासाठी धावा केल्या आहेत. किंबहुना, वादळी खेळ काय असतो, हे दाखविण्याची संधी अद्यापपर्यंत त्याला मिळालेली नाही. ती अहमदाबादमध्ये मिळणार का, हे बघावे लागेल. जडेजा, कुलदीप उत्तम लयीत आहेत. जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज हे भारताचे मुख्य वेगवान गोलंदाजही प्रतिस्पर्ध्याला जेरीस आणत आहेत. किंबहुना, हा वर्ल्ड कप खऱ्या अर्थाने कोण गाजवत असेल, तर तो आहे मोहम्मद शमी. उत्तर प्रदेशातील छोट्याशा खेड्यातून आलेला शमी मागच्या काही दिवसांत तसा संघात आत बाहेरच दिसला. कौटुंबिक अडचणी, त्यातून आलेले नैराश्य, आत्महत्येचा प्रयत्न अशा सगळ्या संकटातून उठून त्याने घेतलेली फिनिक्स भरारी स्तिमित करणारीच ठरावी. न्यूझिलंडविऊद्धच्या सामन्यात भारताने जवळपास 400 धावांचा डोंगर उभा केला खरा. मात्र, इतक्या धावाही कमी पडतात, की काय, अशी परिस्थिती एक वेळ निर्माण झाली होती. किंबहुना, शमीने एकहाती भेदकता दाखवत 7 बळी मिळविले. आत्तापर्यंत अवघ्या सहा सामन्यात सर्वाधिक 23 बळी त्याच्या नावावर आहेत. शमी नावाच्या अमोघ अस्त्राला कशा पद्धतीने सामोरे जायचे, याचे उत्तर ऑस्ट्रेलियाला शोधावे लागेल. ऑस्ट्रेलियाचा संघही आता फॉर्मात आला आहे. हेड, वॉर्नर, मार्श, स्मिथ, लाबूशेन, मॅक्सवेल असे एकापेक्षा एक सरस फलंदाज त्यांच्याकडे आहेत. तर हेझलवूड, स्टार्क, हेड, कमिन्स, झाम्पा अशी गोलंदाजांची गुणवान फळीही आहे. तरीही तुलनात्मक विचार करता भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा सरस म्हणता येईल. विल्यमसन म्हणतो, त्याप्रमाणे सर्वांत धोकादायक म्हणून आज भारतीय गोलंदाजीचा उल्लेख करावा लागेल. त्यांच्या माऱ्यासमोर अडीचशे ते पावणे तीनशे धावा करणे, हेही पुष्कळ झाले. फलंदाजीही तडाखेबंद. त्यात भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळत आहे. त्यामुळे अनुभवी ऑस्ट्रेलिया याला कसा फेस करतो, हे पहायचे. तसे अफ्रिका व न्यूझीलंड, हे अत्यंत गुणी संघ. मागच्या वेळी हातात आलेला करंडक न्यूझीलंडकडून निसटला. तर यंदा भारतासमोर त्यांची डाळ शिजली नाही. दुसरीकडे आफ्रिकेला चोकर्सचा शिक्का पुसता आला नाही. आणखी थोड्या धावा असत्या, तर कांगारूंना नमवणे अवघड नव्हते. मात्र, त्यांनी दिलेली लढत कौतुकास्पदच. भविष्यात दोन्ही संघांकडून अपेक्षा असतीलच. आता उत्सुकता आहे, ती फक्त मेगा फायनलमधल्या रोहितसेनेच्या ‘विराट’ विजयाची.
Previous Articleकेटलबरो, इलिंगवर्थ अंतिम सामन्यासाठी मैदानी पंच
Next Article टेस्ला करणार सुट्या भागांची भारतातून दुप्पट आयात
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment