खूप पूर्वीच्या काळी अर्थात साधारणपणे 60 आणि 70 च्या दशकात एक पैसा, दोन पैसे आदी नाण्यांनाही पुष्कळ किंमत होती. 1990 नंतर जन्माला आलेल्या पिढीने ही नाणी पाहिलेलीही नाहीत. अवनीश शरण नामक एका आयएएस अधिकाऱयाने अशा कालबाहय़ झालेल्या नाण्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेली आहेत. आजकाल या अधिकाऱयाची ही पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. अनेक लोकांनी या जुन्या नाण्यांच्या उपयोगासंबंधीचे त्यांचे अनुभव या पोस्टखाली मांडलेले आहेत. लक्षावधी लोकांनी ही पोस्ट पाहिलेली आहे.
मात्र, या पोस्टमध्ये एक पैशाच्या नाण्याचे छायाचित्र नाही. त्यामुळे अनेक जुन्या पिढीतील सजग लोकांनी ही त्रुटी दर्शवून दिली आहे. तसेच त्यांच्या काळात एक पैशात काय काय येत होते, याची माहितीही दिली आहे. शरण यांनी शेअर केलेल्या छायाचित्रात दोन पैसे, तीन पैसे, पाच पैसे, दहा पैसे, पंचवीस पैसे आणि पन्नास पैसे अशी नाणी आहेत. यापैकी आता केवळ पन्नास पैशांचे नाणे चलनात आहे. बाकीची कालबाहय़ ठरली आहे. आज नाण्यांची काहीही किंमत नसली तरी एकेकाळी ती लोकांचा आधार होती. अनेकांनी शेअर केलेल्या अनुभवांमध्ये स्वारस्यपूर्ण इतिहास समोर आला आहे. 60 च्या दशकात एका पैशात लेमन ज्यूस येत होता. पाच पैशात सहा ग्लास सरबत मिळत होते. एका पैशात शाईची एक गोळी येत होती. ती पाण्यात विरघळवून टाकाच्या साहाय्याने पुस्त्या लिहिल्या जात होत्या. आजकाल पुस्ती हा प्रकारही विस्मरणात गेला आहे. काही व्यक्तींनी हे सर्व पैसे उपयोगात आणल्याचा अनुभव कथन केला आहे. शरण यांच्या पोस्टला मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांनी या नाण्यांसंबंधीच्या भावोत्कट आठवणीच जाग्या केल्या आहेत, अशी प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे.