4 मिनिटांपर्यंत पाण्यात रोखू शकते श्वास
पोहण्याची आवड असणारे अनेक लोक असतात. तर काही जणांसाठी पोहणे हे एखाद्या पॅशनप्रमाणे असते. अशीच पॅशन 34 वर्षीय नाओमी ट्रॉटला आहे. तिला पाणी आणि मरीन लाइफबद्दल इतके प्रेम आहे की ती पाण्यामध्ये 4 मिनिटांपर्यंत स्वतःचा श्वास रोखून धरते. जलपरीचा पोशाख परिधान करून ती पाण्यात उतरते आणि समुद्राच्या खोलीचा आनंद घेते.
शार्क आणि अन्य सागरी जीवांसोबत ती पाण्यात पोहत असते. पेशाने आर्कियोलॉजिस्ट आणि सीनियर कल्चरल हेरिटेज सल्लागार असलेली नाओमी स्वतःचा रिकामी वेळ जलपरी म्हणून पोहताना घालवते. जलपती होणे सोपे नाही, यासाठी मोठी मेहनत करावी लागते असे नाओमीचे म्हणणे आहे. विशेष सरावानंतर नाओमी आता स्वतःचा श्वास 4 मिनिटांपर्यंत रोखू शकते. मुलांना तिचा मरमेडचा अवतार प्रचंड आवडतो.
नाओमी आठवडय़ातील 4 दिवस नोकरी करते, तर शुक्रवार ते रविवारपर्यंत सर्व वेळ ती स्वतःच्या छंदाला देते. ब्रिटनच्या ब्रिस्टलमध्ये राहणारी नाओमीला स्वतःची आवड जोपासताना मुलांना चेहऱयांवर येणारा आनंद पाहून खूपच बरे वाटते.
अनेकदा टँकमध्ये भरलेले पाणी थंड असते आणि यामुळे विशेष थकवा जाणवतो, जेव्हा तुम्ही यात खालच्या बाजूने जाता आणि तुमच्यासमोर उभ्या असलेल्या मुलांना हात हलवून खूण करता, तेव्हा त्यांचे चेहरे पाहण्याजोगे असतात असे तिने म्हटले आहे.
माझ्या आईवडिलांनी मला लहानपणीच पोहणे शिकविले होते. अनेक वर्षे पोहल्यावर मोनोफित किंवा टेलसोबत पोहण्याचा विचार मनात आला. परंतु याकरता मोठी मेहनत आणि अनुभवाची गरज असते. यासाठी सर्वाधिक गरजेची गोष्ट पाण्यात अधिक वेळ श्वास रोखून ठेवणे असल्याचे तिने म्हटले आहे. नाओमी 2019 पासून जलपरी म्हणून परफॉर्मन्स देत आहे. बहुतांश जलपरींची शिफ्ट 20 मिनिटांची असते. अन्य प्राण्यांना नुकसान होऊ नये याची काळजी त्या घेतात. त्यांना वेट बेल्ट, डायव्हिंग वेट आणि सिलिकॉन शेल्स परिधान करावा लागतो.