आज महानगरपालिकेच्या सभागृहात खूपच गडबड सुरू होती. सगळ्या पक्षाचे लोक आपसातील भेदभाव विसरून खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा गोष्टी करत होते. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता. तातडीची मिटींग का बोलावली असेल. गोपनीय म्हणजे नेमके काय असेल ते कळेना. बेचैनी वाढत असताना समोरून महापौर आणि कमिशनर आले. त्याच्यामागे फायलींचा ढीग घेऊन गणपत, त्याच्याकडे पाहून पण काहीच अंदाज येईना. महापौरांनी औपचारीक भाषण केले. सभागृहात कमालीची शांतता पसरली होती. कमिशनर फाईल उघडून वाचायला उभे राहिले. मुंबईहून आदेश आलाय. लगेच कामाला लागायचेय.
विरोधी पक्षातला एक जण बोलू लागला. हे बघा…मुदतपूर्व निवडणूका असतील तर आम्ही होऊ देणार नाही. जनगणना असेल तर…मास्तरांची फौज लावा कामाला. आम्हाला जनतेची सेवा करायचीय, सांगून ठेवतो. हा…बसा बसा कमिशनर बोलू लागले. जनगणनाच करायचीए. पण नगरसेवकांनी. सगळे गलका करायला लागतात. पुन्हा वाचन सुरू होते. जनगणना मेट्रोसाठी करायचीये. एक नगरसेवक…अरे हा काय डोक्यावर पडला का? काय, लोकसंख्या वाढली म्हणून मेट्रो आली. पुन्हा कशाला मोजतात यड्याचा बाजार… ऐका ऐका….जनगणना करायचीए पण माणसाची नाही…..देवांची करायची.
ज्याच्या वॉर्डात देव जास्त त्याला फायदा मोठा. तुम्ही म्हणत असाल तर हे काम शिक्षकाला लावतो. बोला…..सर्वजण एकदम बोलायला लागतात. सभागृह नेते उभे राहून शांत बसा म्हणून हात करतात आणि हे काम आम्ही नक्की करू म्हणून आश्वासन देतात. प्रत्येकाला कामाचे परिपत्रक मिळते आणि सगळ्यांचे फोन सुरू होतात. कार्यकर्ते चार-चार मोबाईल घेऊन निरोप देतात, धावपळ खुप सुरू होते.
बरेचजण पहिल्यांदाच आपल्या वॉर्डात फेरफटका मारणार होते. देवांची जनगणना म्हणजे मंगलवेष पाहिजे. कपाळावर टिळा आणि मोठी गाडी…सोन्याच्या साखळ्या….आणि सुरक्षेसाठी बाऊन्सर. सगळे वॉर्डात देवांची नोंद करत होते. मालकाची, मंडळाची नावे लिहिली जात होती. सामुदायिक आरत्या आणि प्रसाद याची चढाओढ सुरू होती. नगरसेवक भाऊ बरोबर सेल्फी काढत होते. पण हे सगळे नेमके कशासाठी याची कल्पना कोणालाच नव्हती. पुढच्या निवडणुकीची तयारी असेल. भाऊ म्हणजे देव माणूस, वगैरे विचार लोक बोलून दाखवत होते. नगरसेवक मात्र आपण जनतेच्या किती जवळचे आहोत हा भाव सतत दाखवत होते. सगळे देवसुद्धा चक्रावून गेले होते. आज काही विशेष नसताना पुरणाच्या पोळीचा नैवेद्य काय.? आरती काय? फोटो काय? काहीच कळेना. माणसं कशासाठी काय करतील याची पुरेपूर कल्पना असल्याने…..देव सावध होऊन बसले होते. दोन दिवसात हे काम पूर्ण करायचे असल्याने मीडियावाले पण लांब ठेवले होते.
दोन दिवसांनी सगळेजण विजयी मुद्रेने सभागृहात आले. प्रत्येकाजवळ मोठ्या फायली होत्या. कामकाजाला सुरवात झाली. नगरसेवक उभे राहून आपला अहवाल सादर करू लागले……या प्रमाणे……
- मान्यता असलेले देव आणि देवळे चार किंवा पाच
- पत्र्याच्या शेडमधले सार्वजनिक देव हजार
- रस्ता अडवणारे देव पाचशे
- कोपरा अन् कोनाडे अडवलेले देव पाच हजार
- नवसाला पावणारे देव तीन हजार…..
- शिकलेल्याचे देव अडाणी लोकांच्या तुलनेत जास्त होते
- उत्पन्न देणारे देवही भरपूर होते.
हे सगळं ऐकताना कमिशनरच्या डोक्याचा भुगा होण्याची वेळ आली. दर पाच माणसामागे एक देव बसला होता. नगररचनेत त्याच्यासाठी वेगळ्या तरतूदी करायला लागणार होत्या. मेट्रोला जागा मिळवताना….खूप एफएसआय वाटायला लागणार होता.
शेवटी नगरसेवकांनी मार्गदर्शन केले.
- खूप उत्पन्न देणारे देव नगरसेवक सांभाळतील
- सार्वजनिक मंडळाची सोय गावाबाहेर कात्रजच्या पुढे सरकारी गोदामात करण्यात येईल.
- उरलेले देव परदेशात दत्तक पाठवावे
- त्यासाठी सरकारी खर्चाने सर्व नगरसेवक परदेश दौरा करतील
- उरलेले सर्व देव मेट्रोमध्ये शो पीस म्हणून वापरले जातील.
सभा संपली.
दुसऱ्या दिवशी परत तातडीची बैठक बोलावली. कमिशनरची बदली गडचिरोली ला झाल्याची अनाउन्समेंट झाली. सर्व जण सेंड ऑफ पार्टीवर ताव मारायला निघून गेले. प्रत्येकाच्या मनात एकच गाणं होते……मेट्रो आली रे अंगणी.