वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेकडून खरेदी करण्यात आलेल्या एमएच-60 रोमियो हेलिकॉप्टरचे पहिल्यांदाच आयएनएस विक्रांतवर लँडिंग करण्यात आले आहे. यासंबंधीची माहिती नौदलाच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे देण्यात आली आहे.
एमएच-60 रोमियोला जगातील सर्वात अत्याधुनिक पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर्सपैकी एक मानले जाते. एमएच-60 हेलिकॉप्टरची निर्मिती लॉकहीड मार्टिन या अमेरिकन कंपनीने केली आहे. भारताने 90.5 कोटी डॉलर्सच्या कराराद्वारे अमेरिकेकडून 24 हेलिकॉप्टर्स खरेदी केली होती. जुलै 2022 मध्ये अमेरिकेने दोन एमएच-60 हेलिकॉप्टर्स भारताला सोपविली होती. सर्व 24 हेलिकॉप्टर्स 2025 पर्यंत पुरविण्यात येतील असा दावा लॉकहीड मार्टिनने केला आहे.
एमएच-60 वर शत्रूच्या प्रत्येक हालचालीची माहिती देणारे सेंसर अन् रडार आहेत. या हेलिकॉप्टरच्या उ•ाणासाठी 3-4 सदस्यीय चालक दलाची गरज असते. या हेलिकॉप्टरमध्ये जनरल इलेक्ट्रिकडून निर्मित दोन टर्बोशॅफ्ट इंजिन्स आहेत. हे हेलिकॉप्टर एकावेळी 830 किलोमीटरपर्यंत अंतर कापू शकते. तसेच ते 12 हजार फुटांच्या उंचीवर उ•ाण करू शकते.
रोमियो नावाने प्रसिद्ध एमएच-60आर सीहॉक हेलिकॉप्टर पाणबुडीविरोधी मोहिमेसह टेहळणी, लक्ष्याचा शोध, बचावकार्य अन् गनफायर तसेच लॉजिस्टिक सपोर्टमध्ये उपयुक्त आहे. हे हेलिकॉप्टर शत्रूच्या पाणबुड्यांना नष्ट करण्यासह युद्धनौकांना हुसकावून लावण्यास सक्षम आहे.