नेते प्रकाशराव जमदाडे यांची माहिती
जत प्रतिनिधी
खासदार संजयकाका पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत जत विस्तारीत योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळावी अशी आग्रही मागणी केली. या मागणीवर ना. फडणवीस व खा पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी दिली.
जमदाडे म्हणाले, खासदार संजयकाका पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार, सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा कायमस्वरुपी दुष्काळग्रस्त असून १९९५ पासूनची मूळ म्हैसाळ योजना अजूनही अपूर्ण आहे. जत तालुक्यातील ४८ गावे पुर्णतः व १७ गावे अंशतः पाण्यापासून आजही वंचीत आहेत . खा.संजयकाका पाटील हे कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष असताना माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ७ फेब्रुवारी २०१९ रोजी अंकलगी येथे विस्तारित योजना कशी असेल हे प्रोजेक्टर च्या माध्यमातून प्रत्यक्ष दाखवले होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवणीस साहेब हे संख येथे लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने आले असता विस्तारित योजनेस तत्त्वता मान्यता दिली आहे. लवकरच प्रशासकीय मंजुरी देऊन काम सुरू होईल अशी ग्वाही त्यांनी दिली होती.
दरम्यान, याच महत्वाच्या प्रश्नावर आपण सतत पाठपुरावा केला . १ जानेवारी २०२० व १ फेब्रुवारी २०२१ रोजी जत प्रांत कार्यालयासमोर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लाक्षणिक उपोषण केले होते. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांना वारंवार भेटून विस्तारित योजनेला मान्यता देण्याची विनंती केली होती .तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांनी या योजनेसाठी ६ टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले आहे .त्यानंतर खा.संजयकाका पाटील यांनीही कायम विस्तारित योजना पूर्ण करणेसाठी पाठपुरावा करीत आहेत.
काकांच्या माध्यमातून जतच्या दक्षिण भागातील बिळूर व पूर्वेला उमदी पर्यंत पाणी गेले आहे. त्यासाठी तत्कालीन आमदार विलासराव जगताप साहेब यांचेही मोलाचे योगदान आहे .जत तालुक्यातील ६५ गावांकरीता विस्तारीत योजनेसाठी एकूण रुपये १९२८ कोटींची सुधारीत प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता आहे. ही विस्तारीत योजना झालेस जत तालुक्यातील ६५ गावे कायमस्वरुपी दुष्काळ व चारा छावणी मुक्त होणार असून जत तालुक्यातील पूर्व भागासाठी ही योजना वरदान ठरणार आहे. त्यामुळे कृष्णा-कोयना उपसा सिंचन प्रकल्पासाठी एकूण रु. ८१६१ कोटी साठी ५ व्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेबाबत लवकरात लवकर कार्यवाही होवून योजना लवकरात लवकर कार्यांवित व्हावी. त्याचअनुषंगाने योजनेच्या पुर्णत्वासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची आग्रही मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून जत तालुक्याला दुष्काळमुक्त करणेसाठी सर्वतोपरी मदत करुन म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत जत विस्तारीत योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेसंदर्भात निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली आहे, असेही जमदाडे यांनी स्पष्ट केले.