बळी टिपणारा आकाश मधवाल ठरला विजयाचा हिरो, ग्रीन, सूर्यकुमार, नेहल, वर्मा यांची फटकेबाजी
वृत्तसंस्था/ चेन्नई
सामनावीर आकाश मधवालची भेदक गोलंदाजी, कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा यांनी केलेली फटकेबाजी आणि लखनौच्या फलंदाजांचे खराब रनिंग बिटविन द विकेट्स यामुळे मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर लढतीत लखनौ सुपर जायंट्सवर 81 धावांनी दणदणीत विजय मिळवित दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळविले. त्यांची क्वालिफायर लढत गुजरात टायटन्सशी शुक्रवारी होणार आहे.
अफगाणचा सीमर नवीन उल हक व यश ठाकुर यांनी भेदक मारा केल्याने लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला निर्धारित 20 षटकांत 8 बाद 182 धावांवर रोखले होते. मुंबईच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी मजल मारता आली नसली तरी कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा यांनी जोरदार फटकेबाजी करीत मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या रचून दिली. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना पहिल्या आठ षटकांत लखनौने चांगली सुरुवात केली होती. पण पहिल्या टाईमआऊटनंतर नाट्यामय कलाटणी मिळाली आणि 2 बाद 69 वरून लखनौचा डाव 17 व्या षटकात 101 धावांत आटोपला. या आठपैकी चार बळी मधवालने मिळविले. स्टोइनिस, काईल मेयर्स, दीपक हुडा यांच्याव्यतिरिक्त अन्य एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. स्टोइनिसने 27 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 40, मेयर्सने 13 चेंडूत 3 चौकारांसह 18, हुडाने 13 चेंडूत एक षटकासह 15 धावा जमविल्या. याशिवाय मुंबईकडून त्यांना 10 अवांतर धावा मिळाल्या. धावा घेताना लखनौच्या फलंदाजांत समन्वयाचा अभाव दिसून आल्याने त्यांचे तीन फलंदाज धावचीत झाले. उर्वरित काम मधवालने केले. त्याने केवळ 5 धावा देत 5 बळी मिळवित सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. ख्रिस जॉर्डन व पीयूष चावला यांनी एकेक बळी मिळविले. मागील वर्षीही लखनौला क्वालिफायर फेरीतूनच बाहेर पडावे लागले होते.
ग्रीन, सूर्याची फटकेबाजी
आरसीबीविरुद्ध साखळी सामन्यात विराट कोहलीविरुद्ध वादावादी करीत लक्ष वेधून घेतलेल्या नवीन उल हकची चेपॉकवरील प्रेक्षक टर उडवित असल्याचे दिसून आले. मात्र नवीनने आपली कामगिरी चोख बजावत चार बळी टिपताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, मागील सामन्याचा हिरो कॅमेरॉन ग्रीन व धोकादायक ठरणारा तिलक वर्मा यांना बाद केले. त्याने सूर्यकुमार व ग्रीन यांना एकाच षटकात बाद केले, ही बाब कदाचित निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मुंबईला सूर्यकुमारच्या जागी इम्पॅक्ट खेळाडू म्हणून नेहल वढेराला घेणे भाग पडले. वढेराने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करीत एकूण 12 चेंडूत 23 धावा फटकावल्या. शेवटच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारताना तो झेलबाद झाला. त्याने शेवटच्या षटकात यश ठाकुरला एक षटकार व दोन चौकार मारल्याने मुंबईला 180 च्या पुढे मजल मारता आली. प्रभावी गोलंदाज मोहसिन खानने 19 व्या षटकात पुन्हा एकदा किफायतशीर मारा करीत केवळ 6 धावा दिल्या.
प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर कर्णधार रोहित शर्माने संथ सुरुवात केली. वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो चौथ्या षटकात 11 धावा काढून बाद झाला. त्याच्या खेळीत एक चौकार, 1 षटकार होता. पुढच्या षटकात यश ठाकुरने इशान किशनला यष्टिरक्षकाकरवी झेलबाद केले. त्याने 12 चेंडूत 3 चौकारांसह 12 धावा केल्या. 2 बाद 38 अशा स्थितीनंतर सूर्यकुमार व ग्रीन यांची जोडी जमली आणि त्यांनी तिसऱ्या गड्यासाठी 38 चेंडूत 66 धावांची भागीदारी केली. हैदराबादविरुद्ध शतक ठोकलेल्या ग्रीनने 23 चेंडूत 41 धावा झोडपताना 6 चौकार, एक षटकार ठोकला तर सूर्यकुमारने 20 चेंडूत 33 धावा फटकावताना 2 चौकार, 2 षटकार मारले.
मुंबईने पॉवरप्लेच्या 6 षटकांत 2 बाद 62 धावा फटकावल्या. त्यांचे अर्धशतक 5.1 षटकात नोंदवले तर ग्रीन व सूर्यकुमार यांनी 28 चेंडूत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. 61 चेंडूत मुंबई संघाचे शतक या दोघांनी फलकावर लावले तर दीडशतकी मजल 103 चेंडूत मारली. याशिवाय तिलक वर्माने 22 चेंडूत 2 षटकारांसह 26, टिम डेव्हिडने 13 चेंडूत 13 धावा जमविल्या तर मुंबईला 15 अवांतराच्या धावा मिळाल्या. नवीन हकने 38 चेंडूत 4, यश ठाकुरने 34 धावांत 3 तर मोहसिन खानने 24 धावांत एक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स 20 षटकांत 8 बाद 182 : इशान किशन 12 चेंडूत 3 चौकारांसह 15, रोहित शर्मा 10 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 11, ग्रीन 23 चेंडूत 6 चौकार, 1 षटकारासह 41, सूर्यकुमार यादव 20 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 33, तिलक वर्मा 22 चेंडूत 2 षटकारांसह 26, डेव्हिड 13 चेंडूत 13, नेहल वढेरा 12 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 23, जॉर्डन 4, शोकीन नाबाद 0, अवांतर 16. गोलंदाजी : नवीन उल हक 4-38, यश ठाकुर 3-34, मोहसिन खान 1-24. लखनौ सुपर जायंट्स 16.3 षटकांत सर्व बाद 101 : मेयर्स 13 चेंडूत 18, प्रेरक मंकड 3, कृणाल पंड्या 8, स्टोइनिस 27 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 40, आयुष बदोनी 1, पूरन 0, हुडा 13 चेंडूत 15, के. गौतम 2, बिश्नोई 3, नवीन उल हक नाबाद 1, मोहसिन खान 0, अवांतर 10. गोलंदाजी : आकाश मधवाल 5-5, जॉर्डन 1