भारतीय वायुदलाच्या सामर्थ्याची जाणीव आकाशातच होते. परंतु अनेकदा अशा दुर्घटना होतात, ज्यामुळे भारतीय वायुदलाच्या ताफ्यात सामील लढाऊ विमानांमधील त्रुटी ठळकपणे समोर येतात. मिग-21 अशाच लढाऊ विमानांपैकी एक आहे, जे मागील काही वर्षांमध्ये वारंवार दुर्घटनांना सामोरे जात आहे. मिग 21 लढाऊ विमान अनेकदा दुर्घटनाग्रस्त झाले असले तरीही या विमानाने कित्येकवेळा युद्धात भारताला निर्णायक आघाडी मिळवून दिली आहे.
मिग-21 चा इतिहास
मिकोयान-गुरेविच मिग-21 एक सुपरसोनिक लढाऊ विमान असून त्याची निर्मिती सोव्हियत संघाच्या मिकोयान गुरेविच डिझाइन ब्युरोने केली होती. या लढाऊ विमानाला ‘बलालैका’ या नावाने देखील ओळखले जाते, कारण हे रशियन संगीत वाद्य ऑलोवेकप्रमाणे दिसते. भारतीय वायुदलात या लढाऊ विमानाचा 60 च्या दशकात समावेश करण्यात आला होता. अलिकडेच मिग-21 लढाऊ विमानाने भारतीय वायुदलात स्वत:ची 60 वर्षे देखील पूर्ण केली आहेत. मिग-21 एक सिंगल पायलट लढाऊ विमान आहे.
रशियात व्हायची निर्मिती
मिग-21 लढाऊ विमानाची निर्मिती प्रारंभी रशियात केली जात होती. परंतु काही काळानंतर या विमानाची निर्मिती भारतात सुरू करण्यात आली होती. भारताने या विमानाला असेम्बल करण्याचा अधिकार तसेच तंत्रज्ञान देखील प्राप्त केले होते. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) मिग-21 लढाऊ विमानाची निर्मिती सुरू केली होती. तर रशियाने 1985 नंतर या लढाऊ विमानाची निर्मिती थांबविली होती. परंतु भारताचे अपग्रेडेड व्हर्जन वापरत राहिला.
‘फ्लाइंग कॉफिन’ पडले नाव
मिग-21 लढाऊ विमानाने 1955 मध्ये स्वत:चे पहिले उ•ाण केले होते. यानंतर 1959 मध्ये याला अधिकृतपणे सैन्यात सामील करण्यात आले होते. त्या काळात हे विमान अत्यंत अत्याधुनिक प्रकारातील होते. भारताने त्या काळात एकूण अनेक मिग-21 लढाऊ विमानांना स्वत:च्या ताफ्यात सामील केले होते. पुढील काळात हे लढाऊ विमान अनेकदा दुर्घटनाग्रस्त झाले होते, ज्यामुळे या विमानाला ‘फ्लाइंग कॉफिन’ म्हणजेच उडती शवपेटी या नावाने ओळखले जाऊ लागले. 1960 च्या दशकात भारतीय वायुदलाच्या ताफ्यात सामील झाल्यापासून मिग-21 लढाऊ विमान आतापर्यंत 200 हून अधिक वेळा दुर्घटनाग्रस्त झाले आहे. मिग-21 हे एकमेव असे लढाऊ विमान आहे, ज्याचा वापर सुमारे 60 देशांनी केला आहे.
युद्धात प्रभावी कामगिरी
मिग-21 लढाऊ विमान आतापर्यंत अनेकदा दुर्घटनाग्रस्त झाले आहे, परंतु 1960 पासून झालेल्या अनेक युद्धांमध्ये या लढाऊ विमानाने भारतीय सैन्याच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कारगिल युद्ध असो किंवा 1971 चे युद्ध प्रत्येक ठिकाणी या विमानाने भारताला मोठी आघाडी मिळवून दिली आहे. 1971 च्या युद्धात मिग-21 लढाऊ विमानाने भारताच्या पूर्व तसेच पश्चिम सीमेवर शत्रूला सळो की पळो करून सोडले होते. या युद्धात मिग-21 ने पाकिस्तानी सैन्याची 13 लढाऊ विमाने नष्ट केली होती. तर कारगिल युद्धात देखील मिग-21 ने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मिग-21 आणि याच्या अपग्रेडेड वर्जनने पाकिस्तानला मोठे नुकसान पोहोचविले होते आणि भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
मिग-21 ची वैशिष्ट्यो अन् त्रुटी
भारतीय वायुदलाकडे मिग-21 लढाऊ विमानांच्या 4 स्क्वाड्रन्स आहेत. एका स्क्वाड्रनमध्ये 16-18 लढाऊ विमाने सामील असतात. वायुदलाकडे सध्या 64 मिग-21 लढाऊ विमाने असावीत. बालाकोट एअर स्ट्राइकदरम्यान विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग-21 विमानाचेच सारथ्य केले होते आणि याद्वारेच त्यांनी पाकिस्तानी वायुदलाचे एफ-16 लढाऊ विमान पाडले होते. भारतीय वायुदल मिग-21 बायसन या लढाऊ विमानाचा देखील वापर करत होते. मिग-21 लढाऊ विमानाच्या इंजिनाचे तंत्रज्ञान आता खूपच जुने झाले आहे. या विमानाला रशियाने 1985 मध्येच निवृत्त केले होते. तर मिग-21 च्या वाढत्या दुर्घटना पाहता भारत सरकारने याच्या उ•ाणांना रोखण्याचा निर्णय घेतला होता.
50 हून अधिक विमाने दुर्घटनाग्रस्त
मागील 5 वर्षांमध्ये 50 हून अधिक लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर दुर्घटनांमध्ये 55 सैन्य कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. जुन्या मिग-21 विमानांसोबत चिता/चेतक हेलिकॉप्टर्सनी मागील काही वर्षांमध्ये धोकादायक क्रॅश रिकॉर्ड नोंदविला आहे. जुन्या लढाऊ विमानांमधील सुरक्षा सुविधांचा अभाव पाहता जीवितहानी वाढली आहे. लढाऊ विमानांच्या 90 टक्के दुर्घटनांसाठी तांत्रिक दोषच कारणीभूत असल्याचे अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. सशस्त्र दल चिता आणि चेतक हेलिकॉप्टर्सच्या ताफ्याला बदलण्यासाठी दोन दशकांपासून 498 नव्या लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर्सची मागणी करत होते, याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष करण्यात आले हेते. मागील काही वर्षांमध्ये कमीतकमी 7 मिग-21 दुर्घटनाग्रस्त झाली असून यात 5 वैमानिकांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. 2025 पर्यंत मिग-21 बायसन विमानांना वायुदलाच्या ताफ्यातून हटविण्याची योजना आहे.
भारतीय वायुदलासमोरील अडचण
भारतीय वायुदल सध्या विमानांच्या कमतरतेला सामोरे जात अहे. चीन आणि पाकिस्तानशी मुकाबला करण्यासाठी वायुदलाला 42 स्क्वाड्रन्सची गरज आहे, परंतु सध्या सुमारे 32 स्क्वाड्रन्सच उपब्लध आहेत. मागील वर्षी संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीचा अहवाल समोर आला होता. या अहवालात 42 स्क्वाड्रन्सची गरज असल्याचे तसेच सध्या त्यापेक्षा कमी स्क्वाड्रन्स वायुदलाकडे असल्याचे नमूद करण्यात आले होते. आगामी काही वर्षांमध्ये जुनी विमाने निवृत्त होणार असल्याने स्क्वाड्रन्सची संख्या आणखी कमी होणार आहे. वायुदलाकडे सध्याच 160-180 विमाने कमी आहेत, अशा स्थितीत मिग-21 स्क्वाड्रन्सला हटविण्यात आल्यास ही संख्या आणखी 50 वाढणार आहे.
भारतीय वायुदलाकडे विमानांच्या किती स्क्वाड्रन्स
सुखोई-30एमकेआय 12
जग्वार 06
मिग-21 03
मिराज-2000 03
मिग-29युपीजी 03
एलसीए 02
राफेल 02
वायुदलाची तयारी
वायुदल पुढील काही वर्षांमध्ये पूर्णपणे स्वदेशी शस्त्रास्त्रांवर निर्भर असणार आहे. वायुदलाने 83 एलसीए एमके-1 साठी करार केला असून ही विमाने 2024 पासून उपलब्ध होणार आहेत. एलसीए एमके-1 या विमानाच्या 4 स्क्वाड्रन्स तयार केल्या जाणार आहेत. हे विमान मिग-21 आणि मिग-27 ची जागा घेणार आहे. याचबरोबर हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडसोबत एलसीएच आणि एलयुएच हेलिकॉप्टर खरेदीवरून चर्चा सुरू आहे. तसेच सी-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टसंबंधी देखील करार झाला आहे.
चीन अन् पाकिस्तानचे आव्हान
चिनी सैन्याच्या पश्चिम कमांडकडे सुमारे 200 लढाऊ विमाने आहेत, पाकिस्तानी वायुदलाकडे सुमारे 350 विमाने आहेत. अशा स्थितीत चीन किंवा पाकिस्तानशी भारताचे युद्ध झाल्यास आमच्या वायुदलाला 125-150 विमानांची कमतरता जाणवणार आहे. मिग-21 हे आमच्या वायुदलात सर्वाधिक गस्त घालणारे विमान देखील आहे. म्हणजेच या विमानांचा उ•ाण कालावधी देशातील अन्य विमानांपेक्षा अधिक आहे. मिग-21 ची जागा अन्य लढाऊ विमानाने लवकर न घेतल्यास भारतीय वायुदलासमोर मोठी समस्या उभी ठाकणार आहे.
मागील काही दुर्घटना
5 जानेवारी 2021 : राजस्थानच्या सूरतगढमध्ये मिग विमान कोसळले होते, या दुर्घटनेत वैमानिक बचावला होता.
17 मार्च 2021 : मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरनजीक मिग-21 बायसन विमान कोसळले, वायुदलाच्या ग्रूप कॅप्टनचा दुर्घटनेत मृत्यू.
20 मे 2021 : पंजाबच्या मोगामध्ये मिग-21 विमानाची दुसरी दुर्घटना घडली, यात वैमानिकाला जीव गमवावा लागला.
25 ऑगस्ट 2021 : राजस्थानच्या बाडमेरमध्ये मिग-21 पुन्हा एकदा दुर्घटनाग्रस्त, वैमानिक स्वत:चा जीव वाचविण्यास ठरला यशस्वी.
25 डिसेंबर 2021 : राजस्थानातच मिग-21 बायसन दुर्घटनाग्रस्त झाले, या दुर्घटनेत वैमानिकाचा मृत्यू झाला.
28 जुलै 2022 : राजस्थानच्या बाडमेरमध्ये मिग-21 विमान कोसळले, दोन्ही वैमानिकांना जीव गमवावा लागला.
8 मे 2023 : राजस्थानच्या हनुमानगढमध्ये मिग-21 विमान दुर्घटनाग्रस्त, वैमानिक सुखरुप.
रशिया, चीननंतर भारत मोठा वापरकर्ता
रशिया आणि चीननंतर भारत मिग-21 चा तिसरा सर्वात मोठा वापरकर्ता आहे. 1964 मध्ये या विमानाला सर्वप्रथम सुपरसोनिक लढाऊ विमान म्हणून वायुदलात सामील करण्यात आले होते. प्रारंभिक लढाऊ विमाने रशियात तयार करण्यात आली होती. पुढील काळात भारताने या विमानाला असेंबल करण्याचे हक्क आणि तंत्रज्ञान प्राप्त केले होते. तेव्हापासून आतापर्यंत मिग-21 लढाऊ विमानाने 1971 मधील भारत-पाक युद्ध, 1999 मधील कारगिल युद्धासमवेत अनेक वेळा महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. रशियाने 1985 मध्ये या विमानाची निर्मिती बंद केली होती, परंतु भारत याच्या अपग्रेडेड वेरियंटचा वापर करत राहिला.
मिगविषयी घ्या जाणून…
मिग हे रशियाकडून विकसित लढाऊ विमान आहे, याचे डिझाइन आणि निर्मिती सोव्हियत संघाच्या मिकोयन-गुरेविच ब्युरोने केली. मिग कंपनीची स्थापना 8 डिसेंबर 1939 रोजी करण्यात आली होती. याचे संस्थापक मिखाइल गुरेविच आणि आर्टेम मिकोयन होते.
2006 साली मिग कंपनी युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनमध्ये (युएव्ही) विलीन झाली. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या आदेशानुसार युएव्हीमध्ये ल्युशिन, इरकुट, सुखोई आणि तुपोलेव्ह, योकोवलेव्ह या कंपन्यांचेही विलीनीकरण झाले.
भारताने मिग कंपनीचे विमान सर्वप्रथम 1961 मध्ये खरेदी केले होते. तेव्हाचे मिग-21 हे विमान सिंगल इंजिन, सिंगल सीटर होते. 2006 साली याला अपग्रेड करण्यात आले होते.
भारताने 1985 साली मिग-27 खरेदी केले, हे त्या काळातील सर्वोत्तम लढाऊ विमान हेते. मिग-27 हे कमी उंचीवरूनच लक्ष्याचा अचूक भेद करण्यास सक्षम आहे. आकाशातून जमिनीवर मारा करणाऱ्या सर्वोत्तम विमानांपैकी एक. मिग-27 हे विमान डिसेंबर 2019 मध्ये वायुदलातून निवृत्त झाले होते.
पाकिस्तानसोबत झालेले 1971 च्या युद्धात मिग-21 तर 1999 मधील कारगिल युद्धात मिग-21 सोबत मिग-27 लढाऊ विमानाने महत्त्वाची कामगिरी बजावली होती. मिग-21 आणि मिग-29 अद्याप वायुदलाच्या सेवेत आहे.
मिग श्रेणीत एकूण 13 विमाने आहेत, यात मिग-1, मिग-13, मिग-9, मिग-15, मिग-17, मिग-19, मिग-21, मिग-23, मिग-25, मिग-27, मिग-29, मिग-31 आणि मिग-35 सामील आहे.