इमारतीचा अभाव, कर्मचारी इमारत स्थलांतराच्या प्रतीक्षेत
प्रतिनिधी /बेळगाव
कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या सुविधा पुरविणाऱ्या अशोकनगर येथील ईएसआय हॉस्पिटलचे स्थलांतर लांबणीवर पडले आहे. डिसेंबर दरम्यान होणारे हे स्थलांतर काही कारणास्तव रखडले आहे. त्यामुळे बहुचर्चेत असलेल्या ईएसआय हॉस्पिटलच्या स्थलांतराच्या प्रतीक्षेत कर्मचारी आहेत.
अशोकनगर येथील हॉस्पिटलचे स्थलांतर मच्छे येथे होणार होते. दरम्यान स्थलांतराबाबतची सर्व तयारी पूर्ण झाली होती. डिसेंबरदरम्यान स्थलांतर करण्याचे निश्चित झाले होते. मात्र जानेवारी संपत आला तरी अद्याप स्थलांतर रखडले आहे.
उद्यमबाग, मच्छे परिसरात औद्योगिक वसाहत असल्याने कामगार वर्गांची संख्या अधिक आहे. राष्ट्रीय महामार्गापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ईएसआय हॉस्पिटल मच्छे येथील समाज कल्याण खात्याच्या इमारतीत स्थलांतरीत करण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. शिवाय कागदोपत्री व्यवहार पूर्ण होऊन वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे. मात्र सातत्याने हे स्थलांतर लांबणीवर पडत आहे. त्यामुळे स्थलांतर कधी होणार, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.
अशोकनगर येथील हॉस्पिटल इमारतीची पडझड सुरू झाली आहे. यासंबंधीचा अहवाल तामिळनाडू अभियांत्रिकी विद्यापीठातर्फे देण्यात आला होता. तेव्हापासून स्थलांतराच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र इमारतीअभावी सात महिन्यांपासून स्थलांतर लांबणीवर पडले आहे. आता समाज कल्याण खात्याच्या इमारतीत स्थलांतरासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. याविषयी कामगार खाते आणि बेंगळूर सचिवांशी पत्रव्यवहार झाला आहे. त्यामुळे लवकरच ईएसआय हॉस्पिटलचे स्थलांतर होणार आहे.
मच्छे परिसरातच ईएसआय हॉस्पिटलसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. याठिकाणी नवीन इमारत उभारली जाणार आहे. तोपर्यंत हे हॉस्पिटल समाज कल्याण खात्याच्या इमारतीत स्थलांतरीत होणार आहे. त्यामुळे लवकरच उत्तर भागातील कामगारांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
स्थलांतर लवकरच
अशोकनगर येथील रुग्णालय स्थलांतरीत करण्यासाठी सर्व त्या कागदपत्रांची पूर्तता झाली आहे. काही कारणास्तव स्थलांतर थांबले आहे. समाज कल्याण खात्याच्या इमारतीत लवकरच रुग्णालय स्थलांतर केले जाणार आहे. शिवाय नवीन इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार आहे.
-प्रकाश फोंडे (अधीक्षक ईएसआय हॉस्पिटल)