क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेतर्फे मिनी ऑलिम्पिक 14 वर्षाखालील हॉकी स्पर्धेत 5 पैकी 4 सामन्यांत विजय मिळवून 8 गुणांसह उपविजेतेपद मिळविलेल्या संघाचा मंगळवारी भक्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष धनंजय पटेल व गुलाप्पा होसमणी हे होते.
बेंगळूर येथे झालेल्या युवजन क्रीडा खाते व मिनी ऑलिम्पिक संघटना कर्नाटक यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या मिनी ऑलिम्पिक 14 वर्षाखालील हॉकी स्पर्धेत बेळगाव जिल्हा संघाने 8 गुणांसह उपविजेतेपद पटकाविले तर हासन जिल्हा या स्पर्धेत विजेता ठरला. उपविजेता ठरलेल्या बेळगाव जिल्हा मुलींच्या संघाचा हॉकी संघटनेतर्फे गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पूजा जाधव, सादीक शेख, खलीक बेपारी, एम. जे. तेरणीकर, इकबाल बॉम्बेवाले, एन. बी. नदाफ, गुलाब शेख, शकील कोतवाल, लक्ष्मण सैनुचे, अप्पासाहेब गुरव, नेमिनाथ कंग्राळकर, श्रीकांत आजगावकर, जे. ए. जागीरदार, गंगाधर कदम, रजनिकांत पटेल, साकीब बेपारी, गणपत कडोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व पदके देवून त्यांचा खास सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशिक्षक सुधाकर चाळके, उत्तम शिंदे, साकीब बेपारी यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष धनंजय पटेल यांनी, होतकरू तरूण हॉकीपटू बेळगावात निर्माण व्हावेत यासाठी हॉकी संघटनेतर्फे शालेय व महाविद्यालयीन स्पर्धा भरविल्या जात असून, या स्पर्धेतूनच बेळगाव जिल्हा संघाची निवड केली जाते. बेळगाव हॉकीचे नाव संपूर्ण देशभरात असून, बंडू पाटील, लक्ष्मण यांच्यासारख्या ऑलिम्पिकपटूंनी बेळगावच्या नाव उज्ज्वल केले आहे. हीच परंपरा आपण पुढे राखली पाहिजे. यासाठी होतकरू तरूण खेळाडू पुढे येण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी माजी महापौर संजय शिंदेसह पालक संघटनेचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.