– शिवसेना ठाकरे गटाचा आरोप
सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधांचा तुटवडा आहे. सध्या तापाची औषधे प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळत नाहीत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने या प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे . शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सावंतवाडी मतदारसंघाचे असूनही सावंतवाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा पुरवठा नसणे हे त्यांचे अपयश आहे. असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने गुरुवारी पत्रकार परिषदेत करण्यात आला. सावंतवाडी मतदारसंघातील निरवडे, सांगेली आदी प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधे उपलब्ध नाहीत. सध्या पावसाळा असल्यामुळे तापाची साथ आहे. मात्र, तापाच्या गोळ्या तसेच अन्य आवश्यक औषधे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध नाहीत ही गंभीर बाब आहे. केसरकर सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहेत . जनतेला ते वाऱ्यावर सोडत आहेत. त्यांचा कारभार रामभरोसे चालला आहे. कुणी नागरिक दगावल्यास त्याला केसरकर जबाबदार राहतील असे ठाकरे गटाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधाचा पुरवठा ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे याशिवाय शालेय शिक्षण मंत्री असताना सावंतवाडी तालुक्यातील भावी शाळांमध्ये पुस्तकेत पोहोचली नाहीत. पहिली घटक चाचणी जवळ येऊन ठेपली असतानाही पुस्तके आली नाहीत. तेच राहत असलेल्या शहरातील शंभर मुलांना पुस्तके मिळाली नाहीत. केसरकर पुस्तके पोचल्याची घोषणा करत आहेत. परंतु प्रत्यक्षात पुस्तके पोचली नाहीत. आम्ही सर्वे केला असता ही बाब उघड झाली आहे. केसरकर केवळ खोटे बोलत आहेत. शिक्षण विभागाने पुस्तके दिली नसली तरी ठाकरे गटाच्या वतीने विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात येतील. पुस्तकाचे वाटप सुरू झाले आहे शहरातील कळसुळकर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप झाले आहे . अन्य शाळांमध्ये दोन दिवसात पुस्तकांचे वाटप करण्यात येईल. असे स्पष्ट करण्यात आले आहे. केसरकर हे घोषणा मंत्री आहेत. असे टीकास्त्र तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज केले . यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार वेत्ये सरपंच गुणाजी गावडे युवा संघटनेचे योगेश नाईक सुनील गावडे विनोद ठाकूर शब्बीर मणियार यांच्या असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.