प्रतिनिधी,कोल्हापूर
महाडिकांचे जावई विजय ढेरे यांचा पुण्यातील दूध पॅकींगचा ठेका रद्द करुन किकवी येथील अनंत डेअरीला दिलेल्या ठेक्यामधून गोकुळची वार्षिक 4 कोटी रुपयांची बचत होत आहे. जावयाचा रद्द झालेला ठेका आणि महाडिकांचे दूध संघातील बंद झालेले 45 टँकर यामुळे त्यांचा गोकुळमधून होणारा आर्थिक फायदा थांबला आहे.त्यामुळे महाडिक अस्वस्थ झाले आहेत. गोकुळवर केले जात असलेले आरोप चुकीचे असून दिशाभूल करण्याचा प्रयत्न गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक करत असल्याचा आरोप अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
पत्रकात म्हटले आहे, गोकुळच्या दूध संकलनामध्ये घट झालेली नसून गतवर्षीच्या तुलनेत प्रतिदिन 50 हजार लिटर वाढ झाली आहे.सध्या गोकुळ समोर अमुल सारख्या ब्रँडचे आव्हान असताना गोकुळ टिकावा आणि वाढावा तसेच कष्टकरी दूध उत्पादकांचा फायदा व्हावा यासाठी प्रयत्न करत आहोत.गोकुळबाबत वस्तुस्थिती माहित असून सुध्दा चूकीची माहिती दिली जात आहे.संघामध्ये संचालक असणाऱ्या महाडिक यांनी वस्तुस्थिती माहित असताना देखील गोकुळची बदनामी करणे दुर्दैवी असल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी म्हटले आहे.
काकवी येथील दूध पॅकींग ठेक्यामुळे 4 कोटींची बचत
महाडिकांचे जावई यांचे गायत्री कोल्ड स्टोरेज हे पुणे येथील मांजरी बुद्रुक येथे दूध पॅकिंग करत होते. पुण्यातील वाढत्या रहदारीमुळे कोल्हापुरातून दूध घेवून जाणाऱ्या वाहनांना मांजरी प्लांटपर्यंत पोहचण्यास वेळ लागत होता.त्यामुळे वितरकांना वेळेत दुध मिळत नव्हते.म्हणून गोकुळने पुणे मुंबई हायवे शेजारी जागा शोधण्याचा प्रयत्न केला.मात्र संघाच्या सोयीच्या दृष्टीने जागा न मिळाल्याने किकवी येथील अनंत प्लांटला नियमानुसार पॅकिंगचा ठेका दिला.गायत्री कोल्ड स्टोरेज येथे प्रोसेसिंग सुविधा नसल्यामुळे लिकेज दुधाची विल्हेवाट ज्या-त्या वेळी होण्यासाठी कात्रज डेअरीकडे नाममात्र दराने दूध विक्री करायला लागत होते.यामुळे संघास तोटा होत होता.किकवी येथे अद्यावत प्रोसेसिंग सुविधा असल्यामुळे दुधाचे त्वरित प्रोसेसिंग होऊन संघाच्या खर्चात बचत होत आहे.वाहतूक,पॅकींग आणि लिकेज खर्चामध्ये प्रतिमहिना 32 लाख 70 हजार रुपयांची बचत होत आहे.
पशुखाद्य मागणीत 14 टक्क्यांनी वाढ
गोकुळमधील सत्तांतरानंतर संकलन व पशुखाद्य स्टाफच्या मदतीने पशुखाद्य विक्री वाढीसाठी जोरदार प्रयत्न केले. अडीच वर्षात प्राथमिक दूध संस्थाकडून पशुखाद्य मागणीत 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मुंबईच्या दूध विक्रीत 69 लाख लिटरची वाढ
मुंबई बाजारपेठेतील दूध विक्री घटलेली नसून वाढलेली आहे.गतवर्षीच्या तुलनेत मुंबईच्या विक्रीमध्ये वार्षिक 69 लाख लिटर दूधाची वाढ झालेली आहे. सन 2021-22 मध्ये होणारी 28 कोटी 16 लाख लिटर दूध विक्री सन 2022-23 मध्ये 28 कोटी 85 लाख लिटरवर गेली आहे.
दूध संस्था नोंदणी प्रक्रीयेबाबत अज्ञान
नवीन दूध संस्थांना सहाय्यक निबंधक (दुग्ध) कार्यालयाकडून मंजूरी दिली जाते. यानंतर गोकुळ या संस्थांना दूध संकलनासाठी परवानगी देतो. त्यामुळे सर्व नियम पायदळी तुडवून नवीन संस्था स्थापन केल्या या वक्तव्यातून या संपूर्ण प्रक्रीयेबद्दल संचालिका महाडिक यांचे अज्ञान दिसून येते.
सूचना करुनही कामकाजात सुधारणा नाही
ढेरे यांच्या प्रकल्पाबाबत शासनाकडे आणि संघाकडे तक्रारी आल्या होत्या.संघाने त्यांना वारंवार लेखी,तोंडी सूचना करुन सुधारणा करण्याबाबत कळविले होते. हरित लवादामध्येही या प्रकल्पा विरोधात याचिका दाखल झाली होती.अनेक संधी देऊन सुद्धा ढेरे यांनी कामकाजात सुधारण न केल्याने त्यांचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गोकुळ विरोधात न्यायालयाचा निर्णय नाही
ढेरे यांच्या याचिकेबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिलेला नसून तो अरबिट्रेटरने दिला आहे. याबाबत संघाने सर्वोच्च न्यायालयात दाद न मागता जिल्हा न्यायालय कोल्हापुर येथे अपील दाखल केले आहे. लवकरच अरबिट्रेटरने दिलेला आदेश एकतर्फी आहे हे स्पष्ट होईल, असे डोंगळे यांनी पत्रकात म्हटले आहे.