स्पर्धेत 130 देशांतील सुंदरींचा सहभाग अपेक्षित
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
बहुप्रतिक्षित 71 व्या मिस वर्ल्ड 2023 स्पर्धेसाठी भारताची यजमान देश म्हणून निवड झाली आहे. या सौंदर्यस्पर्धेत 130 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मध्ये होणाऱ्या ग्रँड फिनालेच्या एक महिना आधी, स्पर्धकांना शॉर्टलिस्ट करण्यासाठी अनेक फेऱ्या होणार असल्याचे मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने जाहीर केले आहे. 71 व्या विश्वसुंदरी स्पर्धेच्या आयोजनासाठी भारताचे नाव जाहीर करताना आपल्याला अत्यानंद होत असल्याचे मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा आणि सीईओ सुश्री ज्युलिया मॉर्ले यांनी स्पष्ट केले. आपण 30 वर्षांपूर्वी भारताला भेट दिली होती, असेही त्या पुढे म्हणाल्या.
यंदा ‘मिस वर्ल्ड 2023’चे आयोजन भारतात होणार असून उत्तर प्रदेश हे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. वाराणसी आणि आग्रा येथे अनेक ठिकाणी रॅम्पचे आयोजन केले जाईल. चालू वर्षअखेरीस 28 दिवसांत विविध ठिकाणी त्याचे आयोजन करण्यात येणार आहे. मिस वर्ल्ड लिमिटेड आणि पीएमई एंटरटेन्मेंट संयुक्तपणे ‘मिस वर्ल्ड फेस्टिव्हल’ची तयारी करत आहे. विश्वसुंदरी स्पर्धेच्या निमित्ताने 130 हून अधिक देशांतील स्पर्धक आपली अद्वितीय प्रतिभा, बुद्धिमत्ता आणि कौशल्य दाखवण्यासाठी भारतात जमणार आहेत.
यानिमित्ताने देशातील पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्राला चालना मिळणार आहे. या स्पर्धेमुळे भारताचा नावलौकिक वाढल्यामुळे त्याचा सकारात्मक प्रभाव इतर बाबतीतही जगभर पडू शकतो. विश्वसुंदरी स्पर्धेच्या माध्यमातून भारताची अनोखी ओळख आणि वैविध्यपूर्ण संस्कृती, जागतिक दर्जाची आकर्षणे आदींची ओळख जगभर पोहोचणार आहे. देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, विविधतेला चालना आणि महिलांचे सक्षमीकरण करण्याची बांधिलकी या उत्कटतेला आणखी उत्तेजन मिळणार आहे. भारतातर्फे रीता फारिया, ऐश्वर्या राय बच्चन, डायना हेडन, प्रियांका चोप्रा, युक्ता मुखी, मानुषी छिल्लर आदींनी या जागतिक दर्जाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत.