आंध्र प्रदेशातील श्री हरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘चांद्रयाना’चे यशस्वीरीत्या प्रक्षेपण झाल्याने भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’च्या ‘चांद्रयान 3’ मोहिमेला आता खऱ्या अर्थाने सुऊवात झाली आहे. अवघ्या देशाचेच नव्हे, तर जगाचे लक्ष मिशन चांद्रयानकडे लागले असून, यानाचा पुढचा प्रवास कसा राहणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता असेल. चांद्रमोहीम भारतीय अवकाश शास्त्रज्ञांची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम मानली जाते. मागच्या 20 वर्षांतील वेगवेगळ्या चढउतारांना सामोरे जात ही चांद्रमोहीम एका ऐतिहासिक टप्प्यावर येऊन ठेपली आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. अंतराळ संशोधन करणाऱ्या जगातील अग्रगण्य संस्थांपैकी एक असा इस्रोचा नावलौकिक आहे. ‘मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान’ असे ब्रीदवाक्य असलेल्या या संस्थेने आजवर अनेकविध अंतराळ मोहिमांतून अवकाश क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यातील चांद्रयान 1, 2 व 3 या तिन्ही मोहिमांचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते. 2003 साली चांद्रयान नावाने संकल्पना तयार केली. 15 ऑगस्ट 2003 मध्ये औपचारिकपणे या मोहिमेची घोषणा करण्यात आली आणि पुढच्या टप्प्यात त्या दिशेने ठोस पावले पडण्यास सुऊवात झाली. 22 ऑक्टोबर 2008 हा दिवस भारतासाठी विशेष ठरावा. याच दिवशी चांद्रयान 1 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. पहिल्या चांद्रयानात भारत, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, स्वीडन, बल्गेरिया येथे तयार केलेली 11 वैज्ञानिक उपकरणे वाहून नेण्यात आली. चंद्राच्या रासायनिक, खनिज आणि फोटो जिओलॉजिकल मॅपिंगसाठी हे यान चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किमी उंचीवर चंद्राभोवती फिरत राहिले. सर्व उद्दिष्टे या यानाने साध्य केल्यानंतर 2009 मध्ये अवकाशयानाची कक्षा 200 किमीपर्यंत वाढविण्यात आली. या यानाने चंद्राला जवळपास 34000 प्रदक्षिणा घातल्याचे सांगण्यात येते. तथापि, संपर्क तुटल्यानंतर या मोहिमेची अखेर झाल्याचे जाहीर करण्यात आले. अर्थात पहिल्यावहिल्या या यशाने भारतीय शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास दुणावल्याचे दिसून येते. त्यानंतरची ‘चांद्रयान 2’ ही मोहीम अधिक आव्हानात्मक. यात चंद्राच्या अनपेक्षित दक्षिण ध्रुवाचा शोध घेण्यासाठी ऑर्बिटर, लँडर, रोव्हर यांचा समावेश होता. प्रक्षेपण, चंद्राभोवतीची प्र्रदक्षिणा, लँडरचे उतरणे या सगळ्या गोष्टी नियोजित उद्दिष्टाप्रमाणे घडल्या असल्या, तरी नंतरचा यानाचा प्रवास भरकटल्याने ही मोहीम तडीस जाऊ शकली नाही. यान उतरत असताना चंद्राच्या पृष्ठभागापासून 2100 मीटर उंचीवर असताना त्याचा संपर्क तुटल्याने ते कोसळल्याचेच मानले जाते. हे मिशन अयशस्वी ठरल्याने भारतीय शास्त्रज्ञांमधील निराशा लपून राहिली नव्हती. त्या वेळी पंतप्रधानांनी इस्रोचे तेव्हाचे प्रमुख के. सिवन यांचे सांत्वन केल्याचे छायाचित्र सर्वांना आठवत असेल. अर्थात अपयशातूनच यशाचा मार्ग हा अधिक प्रशस्त होत असतो. हे ध्यानात घेत नाउमेद न होता भारतीय शास्त्रज्ञांनी आपला संशोधनयज्ञ सुरूच ठेवल्याने पुन्हा झेपावण्याची जिद्द ते दाखवू शकले आहेत. 615 कोटी ऊपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या मोहिमेचे उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करणे, हे आहे. यान 42 दिवसांचा प्रवास पूर्ण करेल नि त्यानंतर विक्रम लँडरच्या साह्याने प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. चंद्रावरील ही स्वारी अनेकार्थांनी महत्त्वाची असेल. यातून तेथील अधिकची माहिती गोळा करता येईल व चंद्राची रहस्ये उलगडण्यासही मदत होईल. वास्तविक दक्षिण ध्रुवाशी निगडित हे पहिलेच मिशन. तेथे पाण्याचा बर्फ असल्याचे मानण्यात येते. स्वाभाविकच याद्वारे या अज्ञात भागातील अद्वितीय भूविज्ञान आणि रचना यांचा अभ्यास करणे शक्य होईल, असे मानायला जागा आहे. ही मोहीम यशस्वी ठरली, तर भारत चंद्रावर यान उतरविणारा जगातील चौथा देश ठरेल. यातून चंद्रावर प्रकाश टाकतानाच मानवजातीच्या ज्ञानाचा विस्तार करता येईल, ज्याचा लाभ अंतिमत: मानवकल्याणाकरिता होऊ शकेल, अशी अपेक्षा आहे. हे मिशन मार्गी लागल्यास इस्रोच्या आदित्य एल 1, गगनयान, शुक्रयान या मोहिमांनाही बळ मिळू शकेल. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल 1 ही अवकाश मोहीम ऑगस्टमध्ये हाती घेतली जाईल. याअंतर्गत सूर्याच्या प्रभामंडळाचा तसेच चुंबकीय क्षेत्राचा व सौर वाऱ्यांचा अभ्यास केला जाणार आहे. गगनयान अंतर्गत 2024 मध्ये तीन भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठविण्यात येणार असून, त्यांना सुरक्षित परत आणणार आहेत. मानवाला अवकाशात पाठविण्याच्या या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दलही औत्सुक्य असेल. मंगळयान 1 च्या यशस्वीतेनंतर मंगळयान 2 हा कार्यक्रमही हाती घेतला जाणार असून, पुन्हा मंगळावर यान पाठविले जाणार आहेत. त्याचबरोबर शुक्राचा अभ्यास करण्यासाठी ‘शुक्रयान’ही प्रस्तावित आहे. साधारणपणे शुक्रयान झेपावण्यासाठी 2031 ही उजाडू शकते, असे सांगण्यात येते. नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार अर्थात निसार ही भारतीय आणि अमेरिकन अंतराळ संस्थांची संयुक्त मोहीम आहे. याअंतर्गत पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी 2024 साली एक उपग्रह श्री हरिकोटा येथून अवकाशात प्रक्षेपित केला जाणार आहे. एकूणच अवकाश मोहिमांचे इस्रोचे पुढे वेळापत्रकही अत्यंत व्यस्त असल्याचे पहायला मिळते. भारतीय शास्त्रज्ञांच्या परिश्रमाचेच हे प्रतीक ठरावे. भारत अवकाश तंत्रज्ञानाचे प्रणेते म्हणून डॉ. विक्रम साराभाई यांचे नाव घेतले जाते. त्यांनी रचलेला पाया, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी दिलेली दिशा नि कितीतरी शास्त्रज्ञांच्या संशोधन, विद्येवर ही गगनभरारी घेणे देशाला शक्य झाले आहे. हे मिशन सिद्धीस जावो, हीच सदिच्छा!
Previous Articleअरुणाचल प्रदेश भारताचाच अविभाज्य भाग!
Next Article सिटी समूह भारतात 5,000 जणांना देणार रोजगार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment