मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा इशारा : हणजूण येथे पर्यटकांवर हल्ला प्रकरण
पणजी : पर्यटकांशी केलेले गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही. पर्यटकांनी गैरवर्तन केले असल्यास त्यांच्याविरुद्ध तक्रार करा, कायदा हातात घेऊ नका, असे मुख्यमंत्री डॉ, प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्याने हणजूण पर्यटक हल्ल्याच्या घटनेची योग्य दखल घेतली नाही, कलम 307 (खुनाचा प्रयत्न) ऐवजी कलम 324 (स्वेच्छेने धोकादायक शस्त्रs किंवा साधनांनी दुखापत करणे) लागू केले, त्याला निलंबित केले जाईल आणि त्याच्याविऊद्ध चौकशी सुरू केली जाईल. सध्या या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काल सोमवारी पोलीस, पर्यटन आणि कामगार विभागाच्या संयुक्त आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली.
कर्मचाऱ्याच्या बेशिस्तीमुळे घटना
हणजूण हॉटेलमध्ये थांबलेल्या दिल्लीतील पर्यटकांवर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या गटाने हल्ला केला. पर्यटकांनी रॉयस्टन डायस या कर्मचाऱ्याच्या बेशिस्त वर्तनाची तक्रार हॉटेल व्यवस्थापनाकडे केली होती. त्यानंतर हॉटेलने त्याच्यावर कारवाई केली होती. याचा बदला म्हणून तो आपल्या गटासह हॉटेलमध्ये आला आणि त्याने पर्यटकांना बेदम मारहाण केली. पोलिसांनी कलम 324 (स्वच्छेने धोकादायक शस्त्रs किंवा साधनांनी दुखापत करणे) अंतर्गत तक्रार नोंदवली, 4 आरोपींना पकडले आणि नंतर सोडून दिले होते.
कुटुंबाने व्हायरल केला व्हिडिओ
पर्यटक कुटुंबाने हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल केले आणि त्यात पोलिसानी आमची तक्रार गंभीरपणे घेतली नसल्याचा मुद्दा मांडला, त्यात पोलीस तसेच गोवा सरकारवर टीका करतांना पर्यटकांना न्याय दिला जात नसून स्थानिक गुंडाना पोलीस सहकार्य करतात आणि पर्यटकांची सतावणूक करतात असे म्हटले आहे. हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आला. त्यानंतर राज्य यंत्रणा खडबडीत जागी झाली. आयपीसी कलम 307 (हत्येचा प्रयत्न) लागू केला आणि चार जणांना पुन्हा अटक केली. रॉयस्टन डायस, नायरॉन डायस, जोसेफ लोबो आणि काशिनाथ आगरवाडेकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते हणजूण येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी आणखी अटक होण्याची शक्यता आहे.
राज्यात सहा हजार हॉटेल्सची नोंदणी
पर्यटन विभागाच्या हॉटेल नोंदणी मोहिमेमुळे राज्यातील हॉटेल्सची नोंदणी 1,200 वरून 6,000 झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. आउट स्टेशन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यापूर्वी त्यांची पोलिस पडताळणी करावी आणि हॉटेल्सनी ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन करावे. कर्कष आवाजाचा विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, यासाठी रात्री 10 नंतर संगीत वाजवणे टाळावे, अशा सूचना आपण हॉटेलचालकांना दिल्या आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मायकल लोबो यांनी तक्रार दाखल करावी
खंडणीचा प्रकार होत असेल आणि तो आमदार मायकल लोबो यांच्या नजरेस आला असेल तर त्यांनी नावासह लेखी तक्रार दाखल करावी. खंडणी प्रकरणातील व्यक्तीला त्वरित अटक करण्याची आमची तयारी आहे. याबाबत सीएमओ कार्यालयात कळवावे. विनाकारण पत्रकारांसमोर विधाने करून कुणाचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करू नये, असेही मुख्यमंत्री महणाले.