पंचसदस्य, वन, अग्निशामक दल, पोलीस , स्वयंसेवक, दुधसागर टुर ऑपरेटर असोसिएशन यांचे मोलाचे सहकार्य
धारबांदोडा : सावर्डे मतदारसंघाचे आमदार गणेश गावकर यांनी धारबांदोडा तालुक्यातील जनतेचे आभार व्यक्त केले असून ज्या नागरिकांनी तालुक्याच्या विविध ठिकाणी लागलेली आग विझवण्यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे, त्याचे आभार व्यक्त करून सर्वांनी एकजुटीने आग विझवण्याचे काम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. धारबांदोडा तालूक्यातच्या अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्यानंतर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, उपजिल्हाधिकारी, मामलेदार, वन कर्मचारी, पोलीस , अग्निशामक दल, सेवा दल, सेवा संस्थाचे कार्यकर्ते, दुधसागर टुर ऑपरेटर असोसिएशनचे पदाधिकारी व इतर सदस्य व नागरिकांनी आग विझवण्यासाठी आपला जीवाची पर्वा न करता पुढाकार घेतला. या सर्व नागरिकांच्या प्रयत्नामुळेच आग आटोक्यात आणणे शक्य झाले असे पुढे बोलताना म्हणाले. धारबांदोडा तालुक्यातील जैव संपत्ती, रानटी जनावरे व हिरवाचार परिसर अबाधित ठेवण्यासाठी सर्वानी पेलेले प्रयत्न कौतुकास्पद असून तालुक्याच्या सर्वागिण विकासासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहून या आणि असे प्रकार भविष्यात पुन्हा घडणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्नशील व जागृत राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.