नव्या हिंसाचारात काकचिंग जिल्ह्यात 100 घरे जाळली
► वृत्तसंस्था/ इम्फाळ
मणिपूरमध्ये रविवारी रात्रीनंतर पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. काकचिंग जिह्यातील सेरो गावात काही लोकांनी 100 घरांना आग लावली. त्यात काँग्रेस आमदार रणजित सिंह यांच्या निवासस्थानाचाही समावेश आहे. मैतेई आणि कुकी समाजातील लोकांमध्ये 3 मेपासून राज्यात संघर्ष सुरू आहे. आता नव्या घटनेमागे कोणत्या समाजातील लोकांचा समावेश आहे, याची माहिती तातडीने उपलब्ध होऊ शकली नाही. रविवारी रात्री काही लोक सेरो गावात आले आणि त्यांनी आमदार रणजित यांच्या घराची तोडफोड सुरू केली. आमदार व त्यांचे कुटुंबीय घराबाहेर पडल्यानंतर हिंसक जमावाने अनेक घरांना आग लावली.
दरम्यान, सोमवारी सुरक्षा दलांनी 790 शस्त्रे आणि 10,648 दारूगोळा जप्त केला. 3 मे रोजी उसळलेल्या जातीय दंगलीनंतर पोलीस स्थानकांमधून ही शस्त्रे लुटण्यात आली होती. राज्यात 3 मे रोजी हिंसाचाराला सुऊवात झाली होती. या संघर्षात आतापर्यंत 98 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 310 जण जखमी झाले आहेत. तसेच 37 हजारांहून अधिक लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले. हिंसाचारामुळे 11 हून अधिक जिल्हे प्रभावित झाले आहेत.
बीएसएफच्या तुकडीवर हल्ला
जिह्यातील ग्रामीण भागात तैनात असलेल्या बीएसएफच्या पथकावरही जमावाने गोळीबार केला. पोस्टवर मोर्टारने हल्ला करण्यात आला. आतापर्यंत एकही जवान जखमी झालेला नाही. संशयितांनी बीएसएफ चौकीवर हल्ला करण्यासाठी चोरीच्या शस्त्रांचा वापर केल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, सुरक्षा दल आणि हिंसक जमाव यांच्यात गोळीबार झाल्याचेही वृत्त आहे.