चौघे जखमी तर एक गंभीर, महाबळेश्वरात खळबळ
सातारा प्रतिनिधी
महाबळेश्वरच्या माजी नगरसेवकाने ३० ते ३५ जणांच्या जमावासह कुटुंबाला रस्त्यात अडवून त्यांच्यांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडल्याने महाबळेश्वर हादरले आहे. कुमार शिंदे, योगेश शिंदे यांच्यासह जमावाने मारहाण केल्याचा आरोप दीपक भट यांनी केला आहे. या हल्ल्यात एक गंभीर तर इतर चौघे जखमी झाले असून यापैकी दोघांवर सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
महाबळेश्वर येथील माजी नगरसेविकेच्या कुटुंबाला महाड येथे रस्त्यात अडवून माजी नगरसेवक कुमार शिंदे व योगेश शिंदे यांनी इतर ३० ते ३५ जणांच्या जमावासह येवून मारहाण केली. दीपक भट यांनी यासंदर्भात माहीती दिली आहे. या घटनेनंतर महाबळेश्वरात खळबळ माजली असून घटनेची तक्रार उमेश रोकडे यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार कुमार शिंदे, योगेश शिंदे, बबलू पार्टे, संजय शिंदे यांच्यासह इतर अनोळखी चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांचा पोलीस शोध घेत असल्याचे सांगण्यात आले.