वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 24 जून या कालावधीत अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान 23 जून रोजी वॉशिंग्टनमध्ये भारतीय-अमेरिकनांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी 23 जूनच्या संध्याकाळी प्रतिष्ठित रोनाल्ड रीगन बिल्डिंग आणि इंटरनॅशनल टेड सेंटर येथे भारतीय समुदायाला संबोधित करतील. पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान होणाऱ्या कार्यक्रमासाठी 25 प्रतिष्ठित लोकांची राष्ट्रीय आयोजन समिती स्थापन करण्यात आल्याचे भारतीय-अमेरिकन समुदायाचे नेते डॉ. भरत बाराई यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 22 जून रोजी अमेरिकेत दाखल होतील. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन हे अधिकृत दौऱ्याच्या अंतर्गत अमेरिकेत पंतप्रधान मोदींचे स्वागत करणार असल्याचे व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव काराइन जीन-पियरे यांनी सांगितले. तसेच बायडेन यांच्याकडून आयोजित विशेष प्रीतिभोजनातही सहभागी होतील. आगामी दौरा अमेरिका आणि भारत यांच्यातील दृढ आणि मजबूत भागिदारी अधिक वृद्धींगत करणारा ठरणार असल्याचे व्हाईट हाऊसकडून म्हटले गेले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा मुक्त, समृद्ध आणि सुरक्षित हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी दोन्ही देशांची संयुक्त प्रतिबद्धता आणि संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि अंतराळासमवेत आमच्या धोरणात्मक तंत्रज्ञान विषयक भागिदारीला बळ देण्याच्या आमच्या संकल्पाला मजबूत करणारा ठरेल असे व्हाईट हाऊसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.