मतदानापूर्वी लिहिले खुले पत्र
मध्यप्रदेशात शुक्रवारी मतदान होणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी इंदोर शहरात रोड शो करत भाजपच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. तर पंतप्रधान मोदी हे बुधवारी झारखंडच्या दौऱ्यावर होते. याचदरम्यान मध्यप्रदेशातील निवडणूक प्रचाराच्या अंतिम दिनी त्यांनी राज्यातील जनतेच्या नावाने पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी प्रचार मोहिमेविषयी भूमिका मांडून राज्यातील जनतेला भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी यावेळची प्रचारमोहीम तसेच जनतेकडून आशीर्वाद घेण्याची मोहीम अत्यंत खास ठरली. राज्याच्या कानाकोपऱ्यात गेलो, अनेक लोकांना भेटलो आणि त्यांच्याशी संवाद साधला. लोकांमध्ये भाजपमध्ये असलेले प्रेम, विश्वास हेच आमचे मोठे भांडवल असल्याचे मोदींनी पत्रात नमूद केले आहे.
मध्यप्रदेशची नारीशक्ती या निवडणुकीत पुढाकार घेत भाजपचा ध्वज फडकवत आहे. ज्याप्रकारे महिला सशक्तीकरणाला भाजपला प्राथमिकता दिली आहे, त्याचप्रकारे महिलांनी भाजपला पुन्हा सत्तेवर आणण्याचा निश्चय केला आहे. आताची नवी पिढी भारताच्या पुढील 25 वर्षांना आणि स्वत:च्या 25 वर्षांना एकत्र जोडून पाहत आहे. याचमुळे विकसित भारताच्या संकल्पाला साकार करण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी आमचे युवा सक्रीय सहभाग घेत असल्याचे मोदींनी नमूद पेले आहे.
21 व्या शतकातील विकसित मध्यप्रदेश केवळ भाजपच साकार करू शकतो हा अतूट विश्वास लोकांना आहे. मध्यप्रदेशचे लोक डबल इंजिनच्या सरकारचे लाभ पाहत असून याची गरजही ओळखून आहेत. मध्यप्रदेशचे लोक काँग्रेसच्या घराणेशाहीचे राजकारण आणि नकारात्मकतेबद्दल किती नाराज आहेत हे मी सभांमध्ये पाहिले आहे. काँग्रेसकडे मध्यप्रदेशच्या विकासासाठी कुठलेच व्हिजन नाही आणि कुठलाही
रोडमॅप नाही. विकसित मध्यप्रदेशसाठी, विकसित भारतासाठी भाजपला मत द्या, कमळाची निवड करा असे आवाहन करत असल्याचे मोदींनी पत्रात म्हटले आहे.