पुणे / वार्ताहर :
सिंहगड रोड परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत नीरज ढवळे टोळीविरूद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कानुसार केलेली ही 113 वी कारवाई आहे. पुण्यातील बहुतांश टोळय़ा जेरबंद असल्यामुळे गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे.
नीरज लक्ष्मण ढवळे (वय 22, टोळीप्रमुख रा. साईनगर, हिंगणे खुर्द, पुणे), सुरज संतोष ढवळे (19, रा. साईनगर, हिंगणे खुर्द, पुणे), अनिकेत देविदास कांबळे (20 रा. वडगाव बुद्रुक, पुणे), किरण विठ्ठल शिंदे (20 रा. भुमकर मळा, नऱ्हे, पुणे), आतिश राम पवार (20) यांच्यासह तीन अल्पवयीनांविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे.
अधिक वाचा : भूपेंद्र पटेल यांनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
सराईत गुन्हेगार नीरज याने इतर साथीदारांच्या मदतीने सिंहगड रोड परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. मारामारी, खुनाचा प्रयत्न, कोयता आणि इतर घातक शस्त्रे जवळ बाळगणे, दंगा अशाप्रकारचे अनेक गंभीर गुन्हे या टोळीविरूद्ध दाखल आहेत. त्यांच्याविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी सादर केला. त्यावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी टोळीवर मोक्का कारवाईचा आदेश दिला.