पुणे / प्रतिनिधी :
मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असून, नैत्य मोसमी वारे कोणत्याही क्षणी कर्नाटकात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
आठ दिवस उशिरा आठ जूनला मान्सून केरळात दाखल झाला आहे. त्यानंतर त्याच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असून, पुढील 24 तासांत तो मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, केरळचा उर्वरित भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग, कर्नाटकचा काही भाग, मध्य व पूर्वोत्तर बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, पूर्वोत्तर राज्याच्या काही भागात प्रवेश करेल, असा अंदाज हवामान विभागाने शुक्रवारी वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरात न्यून दाबाचे क्षेत्र
उत्तरपूर्व बंगालच्या उपसागरात म्यानमार किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या क्षेत्रामुळे बांग्लादेश तसेच म्यानमार किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत असून, पाऊस पडत आहे. याशिवाय पूर्वोत्तर भारताकडील राज्यातही याचा परिणाम होत असून, या भागात जोरदार पाऊस होत आहे. दरम्यान, या यंत्रणेवर हवामान विभाग लक्ष ठेऊन आहे.