पुणे / प्रतिनिधी :
नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून पुढे सरकला असून, मोसमी पावसाने मंगळवारी अंदमान-निकोबार बेटे व्यापली. येत्या 4 जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होईल, असा अंदाज आहे.
दरवर्षी साधारणपणे मान्सून 22 मेच्या आसपास अंदमान-निकोबार बेटांवर प्रवेश करता असतो. मात्र, यंदा तीन दिवस आधीच म्हणजे 19 मे रोजी दक्षिणपूर्व बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनचे आगमन झाले. पुढच्या तीन ते चार दिवसांत तो संपूर्ण अंदमान व निकोबार बेटे व्यापण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. मान्सूनची वाटचालीला ब्रेक बसला. मान्सून खोळबंल्याने त्याच्या प्रवासाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी त्याने पुन्हा आगेकूच करीत अंदमान-निकोबार बेटे व्यापली. बंगालच्या उपसागरातही त्याची वाटचाल सुरू आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसांत तो आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे.
केरळात 4 जूनला आगमन
दरवर्षी साधारणपणे 1 जूनला मान्सून केरळात दाखल होतो. यंदा मात्र तो 4 जूनच्या आसपास येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर तळकोकणात मान्सून 7 जूनला सक्रिय होत असतो. या खेपेला नेमका तो कधी येणार, याकडे महाराष्ट्रवासियांचे लक्ष लागले आहे.
कमाल तापमानात वाढ, तुरळक पावसाची शक्यता
महाराष्ट्राच्या काही भागांतील कमाल तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढले असून, काही भागांत प्रचंड उकाडा जाणवत आहे. पुढच्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडय़ाच्या काही भागांत तुरळक पावसाची शक्यता आहे. तर पुढचे दोन दिवस हवामान कोरडे राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्याच्या काही भागांत नोंदविण्यात आलेले कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे : पुणे 39.1, जळगाव 42, कोल्हापूर 37, महाबळेश्वर 32, नाशिक 38.7, सांगली 38.2, सातारा 38.5, कोल्हापूर 40.7, मुंबई 34.2, रत्नागिरी 34.1, डहाणू 35.2, औरंगाबाद 40.7, परभणी 41.2, नांदेड 40.2, बीड 42, अकोला 42.2, अमरावती 42.2, बुलढाणा 40.2, ब्रम्हपुरी 40, चंद्रपूर 37.4, गांदिया 40.4, नागपूर 39.9, वर्धा व यवतमाळ 40, तर पणजी 35.