पुणे / प्रतिनिधी :
मान्सूनच्या कालावधीत विकसित होणाऱ्या एल निनोचा यंदाच्या हंगामात प्रभाव राहणार असला, तरी या वर्षी मान्सून सर्वसाधारणच आहे. मात्र, जून महिन्यात मोसमी पावसाची सरासरीपेक्षा कमीच नोंदविली जाणार असून, सरासरीच्या 92 टक्के पावसाची शक्यता आहे. तर केरळात सर्वसाधारण तारखेपेक्षा मान्सूनचे आगमन उशिरा होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला.
2023 च्या मान्सूनचा दुसरा दीर्घकालीन अंदाज वरिष्ठ अधिकारी डॉ. डी. एस. पै यांनी जाहीर केला. पै म्हणाले, मान्सूनच्या कालावधीत एल निनो विकसित होण्याची शक्यता 90 टक्के आहे. याचा प्रभाव 2024 च्या थंडीच्या मोसमापर्यंत जाणवणार आहे. दुसरीकडे इंडियन ओशन डायपोल (आयओडी) हा मान्सूनच्या जून, जुलै, ऑगस्टच्या कालावधीत पॉझिटिव्ह राहणार आहे. पॉझिटिव्ह आयओडी हा नेहमीच चांगला मान्सून देणारा ठरला आहे. त्यामुळे एल निनोचा प्रभाव राहणार असला, तरी मान्सून सरासरीच्या 96 टक्के राहणार आहे. यामध्ये 4 टक्के कमी अधिकतेची शक्यता आहे.
वायव्य भारत वगळता सर्वत्र चांगला पाऊस
या चार महिन्याच्या कालावधीत वायव्य भारत वगळता (सरासरीच्या 92 टक्के) मध्य भारत, पूर्वोत्तर भारत, दक्षिण भारतात सरासरीइतक्या (94 ते 106 टक्क्यांदरम्यान) पावसाची अपेक्षा आहे.
कृषी प्रवण क्षेत्रात चांगला पाऊस
मध्य भारताचा बहुतांश भाग हा कृषीप्रवण क्षेत्रामध्ये येतो. या भागात मान्सूनच्या कालावधीत दमदार पाऊस राहण्याची चिन्हे आहेत.
दक्षिण भारतात चांगला पाऊस
दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तसेच जम्मू काश्मीरचा बहुतांश भाग, पूर्वोत्तर भारताचा बहुतांश भागात जून ते सप्टेंबरच्या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहील, तर गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओरिसा, आंध्र प्रदेशच्या बहुतांश भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार आहे.
महाराष्ट्रात पाऊस कमी
महाराष्ट्राच्या बहुतांश भागात यंदा पाऊस कमी राहण्याचे संकेत आहेत. याबरोबरच गोव्यातही पाऊस कमी राहील, उत्तर कर्नाटकच्या काही भागात पाऊस कमी राहणार आहे. जून महिन्यातदेखील महाराष्ट्रात पाऊस कमी राहील, अशी शक्यता आहे.
जूनमध्ये पाऊस कमी
जून महिना मान्सूनच्या आगमनाचा असल्याने पावसाचे प्रमाण या कालावधीत कमी अधिक राहते. यंदा जून महिन्यात पाऊस कमी राहणार असून, सरासरीच्या 92 टक्के पावसाची शक्यता आहे. जुलै महिन्यात मात्र पावसाची कमतरता भरून निघण्याचा अंदाज आहे. या कालावधीत भारताच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील. केवळ दक्षिण भारत, पूर्वोत्तर भारतात पाऊस चांगला बरसेल.
केरळात मान्सून उशिरा
केरळात सर्वसाधारपणे मान्सून 1 जूनच्या आसपास येतो. यंदा मात्र तो 4 जूनच्या आसपास येण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. यावर बोलताना डॉ. पै म्हणाले, सध्या मान्सून अंदमानात खोळंबला आहे. त्याला लवकरच गती मिळेल, पण 1 जूनच्या आधी मान्सून केरळात येण्याची चिन्हे नाहीत. तो साधारण 4 जूनच्या आसपास केरळात दाखल होईल.