निवृत्त न्यायाधीश ए. एस. पाच्छापुरेंचे प्रतिपादन : आरएल लॉ कॉलेजच्या मूट कोर्ट स्पर्धेचे उद्घाटन
बेळगाव : कायद्याचे शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना न्यायालयीन कामकाजाची माहिती व्हावी, दावे-प्रति दावे कशा पद्धतीने मांडतात याची माहिती मिळावी या उद्देशाने मूट कोर्ट स्पर्धा आयोजिली जाते. या स्पर्धेमुळे आजवर अनेक नामांकित न्यायाधीश व वकील घडू शकले. या स्पर्धेने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव मिळतो, असे प्रतिपादन कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए. एस. पाच्छापुरे यांनी केले. कर्नाटक लॉ सोसायटीच्या आरएल कॉलेजतर्फे आयोजिलेल्या तेराव्या मूट कोर्ट स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन एम. आर. कुलकर्णी, संस्थेचे सेक्रेटरी विवेक कुलकर्णी, सदस्य आर. एस. मुतालिक देसाई, प्राचार्य डॉ. ए. एच. हवालदार, स्पर्धेच्या समन्वयिका अश्विनी परब, रेष्मा भट, तेजस्विनी सोमसाळेसह इतर मान्यवर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, एक न्यायाधीश अथवा वकील म्हणून पूर्वग्रह दूषित विचाराने कोणताच निर्णय घेता येत नाही. रागावर नियंत्रण वक्तशीरपणा, नम्रपणा व शांतता असे गुण न्यायाधीश अथवा वकिलाकडे असणे आवश्यक आहेत. आपल्या स्वभावाचा परिणाम कोणत्याही न्यायावर होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. प्राचार्य हवालदार यांनी स्वागत केले. श्रुती महांत शेट्टी व केदार गोडसे यांनी परिचय करून दिला. मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. यावेळी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, पंजाब, चेन्नई येथून संघ सहभागी झाले होते.