मगोपच्या केंद्रीय समिती बैठकीत ठराव मंजूर : पंतप्रधानांसह सर्व मंत्र्यांना ठरावाच्या प्रती सादर
प्रतिनिधी /पणजी
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचेच नाव मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, असा ठराव मगो पक्षातर्फे घेण्यात आला आहे.
मगो पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक दि. 6 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. त्यावेळी वरील ठराव एकमताने घेण्यात आला. या ठरावाच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी, गोव्याचे भाजप निवडणूक प्रमुख देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पाठविण्यात आल्या आहेत, अशी माहिती मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिली.
भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्याच्या मुक्तीपूर्व काळातही मोठे सामाजिक कार्य केले. त्याद्वारे जात-पात-धर्म विसरून गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या मिळवून दिल्या. अनेक स्वातंत्र्यसैनिकांना मदत केली. त्याच लोकप्रियतेच्या बळावर त्यांना गोव्याचे पहिले मुख्यमंत्री बनण्याचा बहुमान प्राप्त झाला. मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतरही त्यांनी सामाजिक कार्य चालूच ठेवले. त्याचबरोबर राज्याच्या विकासातही भरीव योगदान दिले. शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात गोव्याची केलेली प्रगती, गोमंतकीय संस्कृतीची केलेली जपणूक, त्यांनी केलेला दानधर्म, सरकारी सवलती न घेता गोव्याला दिलेले भ्रष्टाचारमुक्त सरकार, गरीब व पीडित लोकांच्या हितार्थ केलेले कायदे. गोव्याची जपलेली शालीन, सोज्वळ व पवित्र प्रतिमा, आदी मुद्यांचा बैठकीत आढावा घेण्यात आला. या सर्व बाबींचा विचार करता मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाला भाऊसाहेबांचेच नाव द्यावे, असा ठराव एकमताने संमत करण्यात आला, असे ढवळीकर यांनी सांगितले.