गोमंतकीयांना मिळाल्या 1200 नोकऱ्या : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
पेडणे : मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा गोव्याला सर्वाधिक महसूल उपलब्ध करून देणारा प्रकल्प आहे. या विमानतळावर आतापर्यंत 1200 नोकऱ्या गोमंतकीयांना देण्यात आल्या असून यापुढेही आणखी नोकऱ्या देण्यात येतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोपा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला काल बुधवारी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्य सरकारने आतापर्यंत केलेल्या विकासकामांची यादी देणारी पुस्तिका घरोघरी पोहोचवण्यासाठी भाजपाच्या ‘संपर्क ते समर्थन’ या उपक्रमांतर्गत आमदार, मंत्री, नेते ठिकठिकाणी प्रवास करत आहेत. त्याच अनुषंगाने ‘विकास यात्रा’ अंतर्गत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल बुधवारी मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट दिली.
विमानतळावर दिल्या 1200 नोकऱ्या
या विमानतळावर स्थानिकांना किती नोकऱ्या मिळाल्या? असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री सावंत यांना केला असता ते म्हणाले, की आतापर्यंत तब्बल 1200 नोकऱ्या स्थानिकांना मिळालेल्या आहेत. यापुढेही मिळणार आहेत. मांद्रे मतदारसंघासाठी लवकरच पोलिसस्थानक उभारले जाईल, असेही ते म्हणाले.
देशात 72 आंतरराष्ट्रीय विमानतळांची उभारणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीत देशात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 72 आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले आहेत. देशातील चांगल्या दर्जाचा आणि खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ म्हणजे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ पाहण्यासाठी विदेशांतील अनेक क्षेत्रात कार्य करणारे प्रवासी येतात. गोव्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा आणि प्रगती साधणारा हा एक चांगला प्रकल्प आहे. केंद्र सरकारकडून तीस हजार कोटी पेक्षा जास्त खर्च करून हा प्रकल्प उभारला असल्याचेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
पत्रकारांनी विकासप्रकल्पांना प्रसिद्धी द्यावी
गोव्यात झालेला बदल तुम्ही काणकोणपासून पेडणेपर्यंत फेरफटका मारल्यानंतरच समजेल. पुढील पन्नास वर्षे लक्षात घेऊनच विकासकामे केली जातात. पर्यटन, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात सरकार प्रगती साधत आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आयुष हॉस्पिटल व इतर प्रकल्पामध्ये केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा मोठा वाटा आहे. राज्यातील जे जे चांगले प्रकल्प उभारले गेले त्याची प्रसिद्धी गोव्यातील पत्रकारांनी करावी, असेही आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले. आगामी लोकसभेच्या निवडणुकीतही केंद्रात भाजप सरकार बहुमताने निवडून येईल, त्याचबरोबर राज्यातील दोन्ही खासदारांना उत्तरेतून श्रीपाद नाईक यांना आणि दक्षिणेतूनही जो उमेदवार असेल त्यांना निवडून द्यावे, असे असे आवाहन केले.
अनेक प्रकल्पांची उभारणी : श्रीपाद नाईक
मागच्या नऊ वर्षांत केंद्रात नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली विकासात्मक प्रकल्प सुरू आहेत. हजारो प्रकल्प देशभरात झालेले आहेत. काही प्रकल्प सुरू आहेत. जे प्रकल्प उभारलेले आहेत त्या प्रकल्पांची माहिती लोकांना मिळावी यासाठी विकास यात्रा हा उपक्रम भाजपने सुरू केलेला आहे. विमानतळाचे काम दहा वर्षे रखडले होते. त्यामुळे अनेकांना नुकसानी झाली. परंतु भाजप सरकार राज्यात आणि केंद्रात आल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळाली. हा प्रकल्प पूर्णत्वाकडे गेला. शिवाय जीएमआर कंपनीनेही व्यवस्थित प्रकल्प उभारून त्याची देखभाल ठेवलेली आहे. ती याही पुढे ठेवावी, असे आवाहन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी यावेळी केले.
विकासाला गती देण्यास सरकार कटिबद्ध : तानावडे
नऊ वर्षाच्या कारकिर्दीत केंद्र सरकारने केलेल्या विकासकामांची गती कशी आहे याचे दर्शन विकास यात्रा या निमित्ताने करून हे प्रकल्प जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजप सरकार करत आहे. याही पुढे अशाच प्रकल्पांना गती देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले. पेडणे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे, मयेचे आमदार आमदार प्रमेंद्र शेट, पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस, मांद्रे मतदारसंघ भाजप अध्यक्ष मधु परब, नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, नगरसेविका उषा नागवेकर, नगरसेवक मनोज हरमलकर, नगरसेवक शिवराम तुकोजी, कासारवर्णेचे सरपंच नवनाथ नाईक, पोरस्कडेच्या सरपंच निशा हळदकर, तोर्सेचे माजी सरपंच सूर्यकांत तोरस्कर, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, माजी सरपंच अनंत गडेकर, दीपा तळकर, नयनी शेटगावकर, अनिशा केरकर आधी समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.