सेक्शन ऑफिसर, ज्युनि. इंजिनिअर यांचा समावेश
बेळगाव : मागील दहा दिवसांपासून घरोघरी तसेच सार्वजनिक मंडपांमध्ये विराजमान झालेले गणराया गुरुवार दि. 28 रोजी निरोप घेणार आहेत. बेळगावमध्ये भव्य विसर्जन मिरवणूक काढली जाते. यावेळी विजेच्या कोणत्याही तक्रारी उद्भवू नयेत तसेच विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी, यासाठी हेस्कॉमचे दीडशेहून अधिक कर्मचारी व अधिकारी ड्युटीवर असणार आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेशमूर्तींची उंची वाढविण्यात आली आहे. सर्रास गणेशमूर्ती या 15 ते 18 फुटांच्या आसपास असल्यामुळे विसर्जन मिरवणुकीवेळी विद्युतवाहिन्यांचा स्पर्श होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. गणेशोत्सवापूर्वी हेस्कॉमने शहरातील बऱ्याचशा जुन्या विद्युतवाहिन्या तसेच लोखंडी विद्युतखांब काढले होते. त्या ठिकाणी एरियल बंच केबल घालण्यात आल्या आहेत. विशेषत: विसर्जन मार्गावर बऱ्याच ठिकाणी एबीसी केबल घालण्यात आल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीत कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी 129 लाईनमन, 23 सेक्शन ऑफिसर व ज्युनियर इंजिनियर व 4 कार्यकारी अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याचबरोबर 4 दुरुस्ती वाहने शहराच्या सर्व भागात तैनात असणार आहेत. एखाद्यावेळी ट्रान्स्फॉर्मरमध्ये बिघाड झाल्यास दोन ट्रान्स्फॉर्मर असणारी वाहने त्या ठिकाणी पोहोचून त्वरित वीजपुरवठा सुरळीत करणार आहेत. गणेशमूर्ती मंडपाबाहेर काढताना कार्यकर्त्यांनी संबंधित विभागाचे लाईनमन अथवा सेक्शन ऑफिसर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.