वृत्तसंस्था/ लाहोर
भारतात सुरू असलेल्या आयसीसीच्या 2023 सालातील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाक क्रिकेट संघाला उपांत्य फेरीपासून वंचित व्हावे लागले. या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याने पाक संघाचे गोलंदाज प्रशिक्षक दक्षिण आफ्रिकेच्या मॉर्नी मॉर्केलने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
पाक संघाची या स्पर्धेतील कामगिरी निराशजनक झाल्याने मॉर्केलने नैतिक जबाबदारी स्वीकारुन आपला करार संपुष्टात येण्याअगोदरच स्वखुशीने राजीनामा दिला आहे. सदर माहिती पाक क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्यांनी दिली. या स्पर्धेमध्ये प्राथमिक फेरीतील पाकचा शेवटचा सामना कोलकाता येथे इंग्लंडविरुद्ध झाला आणि त्यामध्ये पाक संघाला 5 गड्यांनी पराभव पत्करावा लागला होता. गेल्या जून महिन्यात मॉर्केलबरोबर पीसीबीने सहा महिन्यांचा करार केला होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली पाक संघाने लंकेच्या दौऱ्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. आता पाक आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका 14 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान ऑस्ट्रेलियात होणार आहे. आता मॉर्केलच्या जागी उमर गुलची नियुक्ती केली जाईल, अशी चर्चा सुरू आहे. पाक संघाला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाण या संघांकडून पराभव पत्करावा लागला होता.