मोदी सरकाने मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या केली असून भाजपच्या राजकारणाने केवळ मणिपूरची नाही तर संपुर्ण भारतमातेची हत्या घडवून आणली असल्याचा हल्लाबोल राहूल गांधी यांनी आज लोकसभेत केला. पुढे बोलताना त्यांनी भाजपचे नेते देशद्रोही असल्याचा आरोप करून मणिपूरच्या स्थितीला संपुर्ण मोदी सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
संसदेत मोदी सरकारविरूद्ध मांडलेला अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधी यांनी आज लोकसभेत भाषण केले. वायनाड मतदारसंघाचे खासदार असलेल्या राहूल गांधी यांनी प्रथम लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे लोकसभेचे सदस्यपद पुन्हा बहाल केल्याबद्दल आभार मानले.
आपल्या भाषणात बोलताना राहूल गांधी म्हणाले, “काही दिवसांपूर्वीच मी मणिपूरला गेलो पण आमचे पंतप्रधान अजूनही गेलेले नाही. आपल्या पंतप्रधानांसाठी मणिपूर हिंदुस्थानचा भाग नाही. मी मणिपूर शब्दाचा वापर केला असला तरी आता ते मणिपूर राहीलेलं नाही. मणिपूरला तुम्ही दोन भागांमध्ये विभागले आहे. मणिपूरच्या रिलीफ कॅम्पमध्ये गेलो असताना मी तेथिल महिलांशी संवाद साधला…तिथल्या मुलांशी बोललो… हे आपल्या पंतप्रधानांनी करायला हवं होतं. तिथे एका महिलेला मी तुमच्याबरोबर काय झालं अस विचारले असता ती म्हणाली माझ्या डोळ्यांसमोर माझ्या मुलाला गोळी मारली गेली.” असं राहुल गांधी म्हणाले. राहूल गांधींच्या या आरोपानंतर सत्ताधारी नेत्यांनी हे खोटे असल्याचे म्हटले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “भाजपने मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या केली असून यांच्या राजकारणाने मणिपूरला नाही हिंदुस्थानला मणिपूरमध्ये मारलं आहे…हिंदुस्थानची हत्या केली आहे… भाजपने मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली आहे. तसेच तुम्ही मणिपूरच्या लोकांना मारून हिंदुस्थानची हत्या केली असून तुम्ही देशद्रोही आहात.” असा आरोप त्यांनी केला.
राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाष्य करताना म्हटले आहे कि, “पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत. कारण त्यांनी मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली आहे. तुम्ही भारत मातेचे रक्षक नसून भारत मातेचे खूनी आहात” अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधानांवर आरोप केले.
आपल्या भाषणाचा शेवट करताना ते म्हणाले, “मी मणिपूरमधील माझ्या भारतमातेच्या हत्येविषयी बोलत असून माझी एक आई इथे बसली आहे. तर दुसऱ्या आईला तुम्ही मणिपूरमध्ये मारलं आहे. जोपर्यंत मणिपूरमधील हिंसाचार थांबवत नाही, तोपर्यंत तुम्ही माझ्या आईची हत्या करत आहात. भारताचं सैन्य मणिपूरमध्ये एका दिवसात मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करेल पण तुम्हाला तसे करायचे नाही कारण तुम्हाला हिंदुस्थानला मणिपूरमध्ये मारायचं आहे” असा थेट हल्ला राहूल गांधी यांनी केंद्र सरकारवर केला.