स्थानिकांची हेस्कॉमकडे मागणी
बेळगाव : विनायकनगर, हिंडलगा येथे धोकादायक ट्रान्स्फॉर्मर असून तो इतरत्र हलवावा, अशी मागणी मागील सहा महिन्यांपासून हेस्कॉमकडे केली जात असताना अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. या ट्रान्स्फॉर्मरवर अनेकवेळा शॉर्टसर्किट होत असून आजूबाजूच्या नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. कोणताही मोठा अनर्थ घडण्यापूर्वी ट्रान्स्फॉर्मर इतरत्र बसवावा, अशी मागणी स्थानिकांनी हेस्कॉमकडे केली आहे. विनायकनगर येथे काही महिन्यांपूर्वी एका अवजड वाहनाने ठोकरल्याने विद्युत खांब व ट्रान्स्फॉर्मरचे नुकसान झाले होते. विद्युत खांब तात्पुरत्या स्वरुपात सरळ करण्यात आले असले तरी ट्रान्स्फॉर्मर मात्र धोकादायक स्थितीत आहे. त्यातून येणाऱ्या विद्युतवाहिन्या हाताला लागण्याइतपत खाली असल्याने धोका वाढला आहे. त्यामुळे हा ट्रान्स्फॉर्मर इतरत्र हलवावा, अशी मागणी विश्वास दळवी यांनी 19 नोव्हेंबर 2022 रोजी हेस्कॉमकडे केली होती. सहा महिने उलटले तरी अद्याप ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती अथवा तो हलविण्यासाठी कोणताही प्रयत्न झालेला नाही. अधिकाऱ्यांची बदली झाल्याने नवीन अधिकाऱ्यांना त्या विषयाची माहिती नाही. त्यामुळे स्थानिकांनी दाद मागायची तरी कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.