ऑनलाईन टीम / तरुण भारत :
चंद्रपूरमधील काँग्रेसचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. स्वादुपिंडाचं इन्फेक्शन झाल्यामुळे रविवारी त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना तातडीने नागपूरहून दिल्लीला हलवण्यात आले होते. सध्या गुडगावमधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बाळू धानोरकर यांचे वडील नारायणरावजी धानोरकर यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर धानोरकर यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी त्यांच्या वडिलांच्या पार्थिवावर चंद्रपूरमधील भद्रावती या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, प्रकृती ठिक नसल्याने वडिलांच्या अंत्यविधीलाही धानोरकर उपस्थित राहू शकले नव्हते. रविवारी दुपारी धानोरकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नागपुरातून विशेष एअर ॲम्बुलन्सने दिल्लीला नेण्यात आले. सध्या गुडगावमधील मेदांता रुग्णालयात ते उपचार घेत असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.