ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यसेवा परीक्षेतील बदल 2025 पासून लागू करण्याच्या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला यश आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) लागू केलेल्या नवीन परीक्षा पद्धतीतील नियम 2025 पासून लागू करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. लवकरच या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मागील वर्षी अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला होता. 2023 पासून नवीन अभ्यासक्रम व पद्धतीनुसार परीक्षा होणार असल्याचे आयोगाने जाहीर केले होते. मात्र, हे नवे नियम 2025 पासून लागू करण्याच्या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यासह राज्यभर आंदोलन छेडले होते. आज पुण्यातील आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार अभिमन्यू पवार सहभागी झाले. आंदोलनादरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कॉल केला. फडणवीसांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करुन आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा करुन निर्णय घेण्याचे आश्वासन दिलं होते.
अधिक वाचा : अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी
मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर हे नियम 2025 पासून लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून तत्वतः मान्यता मिळाली. लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे.