आयुष शर्मा नायकाच्या भूमिकेत
‘एएस04’ या चित्रपटाचा टीझर अलिकडेच सादर करण्यात आला आहे. या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. टीझरमध्ये आयुष शर्माचा ऍक्शन अवतार दिसून येत आहे. या चित्रपटातील अभिनेत्रीचे नाव आता उघड करण्यात आले आहे.
या चित्रपटात अभिनेत्री सुश्री मिश्राची वर्णी लागली आहे. सुश्री ही माजी फेमिना मिस इंडिया युनायटेड कॉन्टिनेंट्सची स्पर्धक राहिली आहे. ‘एएस04’ या चित्रपटात ती आयुषसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे. सुश्री पहिल्यांदाच नायिकेच्या भूमिकेत दिसून येणार आहे. यापूर्वी तिने काही चित्रपटांमध्ये अत्यंत छोटय़ा भूमिका साकारल्या होत्या. यात ‘झिरो’ आणि ‘मलाल’चा समावेश आहे.
आयुषने सुश्रीसोबतचे छायाचित्र शेअर केले आहे. सुश्रीने देखील आयुषच्या पोस्टवर कॉमेंट करत आभार व्यक्त केले आहेत. सुश्री सुंदर असण्यासह स्वतःची अभिनयक्षमता आणि ऍक्शनदृश्यांसाठी पूर्णपणे योग्य असल्याची प्रतिक्रिया आयुषने व्यक्त केली आहे. सुश्री ही राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू, घोडेस्वार आहे. तसेच मार्शल आर्टमध्ये प्रशिक्षित आहे. ‘एएस04’ या चित्रपटाचे दिग्दर्शन कात्यायन शिवपुरी करणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.