महिला प्रिमियर लीग एलिमिनेटर लढत ः यास्तिका, अमेलियाची फटकेबाजी, एक्लेस्टोनचे 2 बळी
वृत्तसंस्था/ नवी मुंबई
नॅट सिव्हर ब्रंटने केलेल्या वेगवान नाबाद अर्धशतकाच्या बळावर मुंबई इंडियन्सने महिला प्रिमियर लीगमधील एलिमिनेटर लढतीत निर्धारित 20 षटकांत 4 बाद 182 धावा जमविल्या. नॅट सिव्हर ब्रंटने केवळ 38 चेंडूत नाबाद 72 धावा झोडपल्या.
नॅट सिव्हरने जबरदस्त फटकेबाजी करीत आपल्या खेळीत 9 चौकार व 2 षटकार मारले. 6 धावांवर असताना मिळालेल्या जीवदानाचा तिने पुरेपूर लाभ उठविला. राजेश्वरी गायकवाडच्या गोलंदाजीवर सोफी एक्लेस्टोनने तिचा सोपा झेल सोडला होता. या बाद फेरीच्या लढतीत सुरुवातीला यूपी वॉरियर्सने नियंत्रण राखले होते. त्यात स्पिन गोलंदाजांचा जास्त वाटा होता. त्यांनी मुंबई इंडियन्स फलंदाजांवर अंकुश ठेवत मोठे फटके मारू दिले नाहीत आणि सिव्हर ब्रंटचा अपवाद वगळता त्यांच्या फलंदाजांना वैयक्तिक मोठे योगदानही देण्यापासून रोखले.
सिव्हर ब्रंटने अखेरच्या टप्प्यात जोरदार फटकेबाजी करीत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. तिला अमेलिया केरकडून चांगली साथ मिळाली. अमेलियाने 19 चेंडूत 5 चौकारांसह 29 धावा फटकावताना ब्रंटसमवेत चौथ्या गडय़ासाठी 60 धावांची भर घातली. 5 ते 15 व्या षटकांपर्यंत मुंबईने 78 धावांची भर घातली, पण शेवटच्या पाच षटकांत त्यांनी 66 धावा फटकावल्या. यास्तिका भाटिया (21), हेली मॅथ्यूज (26), हरमनप्रीत कौर (14) यांनी सुरुवात चांगली केली. पण यूपी वॉरियर्सच्या गोलंदाजांनी नियंत्रण ठेवत त्यांना मोठी धावसंख्या रचू दिली नाही.
सुरुवातीला यूपीच्या गोलंदाजांनी स्वैर मारा केला, त्याचा लाभ मुंबईच्या सलामीवीरांनी उठविला. यास्तिकाने 18 चेंडूत 21 धावा फटकावताना 4 चौकार मारले आणि मॅथ्यूजसमवेत 31 धावांची सलामी दिली. मॅथ्यूजने ग्रेस हॅरिसला डीप स्क्वेअरलेगला सामन्यातील पहिला षटकार मारला. पॉवरप्लेअखेर मुंबईने 1 बाद 46 धावांची मजल मारली होती. मॅथ्यूज व सिव्हर ब्रंट जोडी दीप्ती शर्माने नवव्या षटकात बाद केली होती. पण तिसऱया पंचांनी मॅथ्यूजला नाबाद ठरविले. 16 वर्षीय पार्शवी चोप्राने मॅथ्यूजला अखेर 26 धावांवर बाद केले. चोप्राने हरमनप्रीतला 4 धावांवर पायचीत केले होते. पण रिव्हय़ूमध्ये ती नाबाद ठरली. ब्रंटने नंतर आक्रमक हल्ला करीत चोप्राला 12 व्या षटकात दोन चौकार, एक षटकार मारला. पुढच्या षटकात मुंबईने शतकी मजल मारली आणि हरमनप्रीतही बाद झाली. एक्लेस्टोनने तिला त्रिफळाचीत केले. पूजा वस्त्रकारने 4 चेंडूत 1 षटकार व 1 चौकार मारत नाबाद 11 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक ः मुंबई इंडियन्स महिला 20 षटकांत 4 बाद 182 ः यास्तिका भाटिया 21 (18 चेंडूत 4 चौकार), हेली मॅथ्यूज 26 (26 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), नॅट सिव्हर ब्रंट नाबाद 72 (38 चेंडूत 9 चौकार, 2 षटकार), हरमनप्रीत 14 (15 चेंडूत 1 चौकार), अमेलिया केर 29 (19 चेंडूत 5 चौकार), पूजा वस्त्रकार नाबाद 11 (4 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), अवांतर 9. गोलंदाजी ः अंजली सरवानी 1-17, एक्लेस्टोन 2-39, चोप्रा 1-25.