- महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांची घोषणा
- मेरशीत उत्तर गोवा जिल्हाधिकारी नवी इमारत बांधणार
- मुरगावसाठी उपजिल्हाधिकारी,मामलेदार नवी इमारत
प्रतिनिधी / पणजी
मेरशी-तिसवाडी येथे नवीन उत्तर गोवा जिल्हाधिकारी इमारत बांधण्याची योजना असून फोंडा व मुरगावसाठी नवीन उपजिल्हाधिकारी, मामलेदार इमारत बांधण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिली. याचबरोबर मुंडकार-कुळकार प्रकरणे वर्षभरात निकालात काढण्याचे निर्देश दोन्ही जिल्हाधिकाऱयांना दिल्याचे ते म्हणाले. आपल्या खात्याच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतान ते बोलत होते.
त्यांनी सांगितले की, मामलेदार कोर्टातील प्रकरणे त्वरित निकालात काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल खात्याच्या विविध कार्यालयात पुरेसा कर्मचारीवर्ग, साधनसुविधा देण्यात येणार आहेत. तलाठींना टॅबलेट देण्याचा इरादा मोन्सेरात यांनी व्यक्त केला. म्युटेशन आणि पार्टीशन प्रकरणे सहा महिन्यात सोडवण्याचे आदेश बजावण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. 15 मामलेदार व 5 उपजिल्हाधिकारी पदे रिकामी असून ती त्वरित भरण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. बेकायदा बांधकामे जमीन रुपांतरे राखण्यासाठी तलाठींना तपासणी करण्यास सांगण्यात आले असून कारवाईचे आदेश उपजिल्हाधिकाऱयांना देण्यात आले आहेत.
नुकसान भरपाईची रक्कम वाढवा
झाडे व घरे पडली आणि नुकसान झाले तर रु. 6000 ते रु. 8000 अशी फुटकळ भरपाई दिली जाते. हानी होते लाखोंची मग ही भरपाई कामाची नाही आणि ती घ्यायला कोण पुढेच येत नाही. ती वाढवा अशी मागणी आमदार दिगंबर कामत यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आणीबाणी कार्यवाहीसाठी यंत्रणाच नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणले.
मासळी स्वस्त दरात उपलब्ध करा
कोरोना काळात मडगावात ईएसआय हॉस्पिटलने चांगले काम करून अनेकांचे जीव वाचवले. सोनसडा कचरा व्यवस्थापन महामंडळाकडे देण्याची सूचना कामत यांनी केली. मासळी जनतेसाठी स्वस्त दरात उपलब्ध करा आणि त्यासाठी यंत्रणा वापरा असेही ते म्हणाले.
म्हापसा येथील उपजिल्हाधिकारी, मामलेदार कार्यालये यांची इमारत बिकट अवस्थेत असून तेथे मुंडकार-कुळकार प्रकरणे वाढत आहेत आणि असलेली प्रकरणे निकालात निघत नाहीत असे मायकल लोबो यांनी निदर्शनास आणले. तेथे नवी इमारत बांधा असेही त्यांनी सुचवले. सरकारी, कोमुनिदाद जमिनी बळकावण्यात येत असून तेथे अतिक्रमणे, बेकायदा बांधकामे वाढत आहेत. त्यावर कारवाई होत नाही. दोन्ही जिल्हय़ात आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज हवी, असे ते म्हणाले. बेकारी कमी करण्यासाठी उद्योगात गोमंतकीयांना नोकऱया मिळाल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. एलईडी-बुल ट्रॉलिंग मासेमारी बंद करा, असे ते म्हणाले.
जखमी जनावरांसाठी वाहनसेवा
पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांची विधानसभेत घोषणा
प्रतिनिधी / पणजी
जखमी होणारी गुरे, जनावरे यांच्यावर उपचार करण्यासाठी 108 च्या धर्तीवर 24/7 वाहनसेवा सुरू होणार असून मुळगाव-डिचोली येथे पशुचिकित्सा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव असल्याची माहिती पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली. आपल्या खात्याच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते विधानसभेत बोलत होते.
त्यांनी पुढे सांगितले की गोव्यात पशुचिकित्सा करण्यासाठी पाच हॉस्पिटल्स असून 25 दवाखाने तर 48 सेवाकेंद्रे आहेत. तेथे जनावरांवर योग्य ते उपचार करण्यात येतात. शिवाय त्यांना लागणारी औषधे, डॉक्टर तेथे उपलब्ध असतात.
2021-22 या वर्षात पशु औषधांवर रु. 2.20 कोटी खर्च करण्यात आले असून उपचारांची चांगली सोय देण्यात आली आहे. कामधेनू योजनेमुळे दूधसंकलनात वाढ झाली असून दुधाचा दर्जाही चांगला आहे. गोव्यात सुमारे 2408 दूध उत्पादक शेतकरी असून त्यांच्याकडे 16880 दुभती जनावरे आहेत. त्या शेतकऱयांना 2021-22 या वर्षात रु. 11.21 कोटीचे अनुदान देण्यात आले. कम्युनिटी डेअरी फार्मिंग योजनेत रु. 6.50 लाखाचे अनुदान वितरित करण्यात आल्याचे हळर्णकर यांनी सांगितले.
जनतेला स्वस्त किफायतशीर दराने मासळी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून पाच मोबाईल वाहने मच्छीमार सोसायटीकडे देण्यात आली आहेत. मडगाव येथे होलसेल मासळी मार्केट नव्याने बांधण्यात येणार असून त्यासाठी रु. 41 कोटी खर्च होणार आहेत. प्रतीदिन मिळणाऱया मासळीवर त्याचे दर अवलंबून असतात. नवीन मार्केट एसजीपीडीएच्या ताब्यात देण्यात येणार असून त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.