याचिकेबाबत उद्या सुनावणी होण्याची शक्यता : त्यानंतरच लिलाव प्रक्रिया होणार
बेळगाव : शहरातील महापालिका गाळ्यांच्या भाडेकरुंनी महापालिकेमध्ये गाळे लिलाव करू नयेत म्हणून उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविली आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रिया पूर्णपणे रखडली होती. महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे कायदा सल्लागार अॅड. महांतशेट्टी यांनी गाळेधारकांविरोधात उच्च न्यायालयातच याचिका दाखल केली असून त्या याचिकेवर बुधवार दि. 4 रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच लिलाव प्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार आहे.
शहरातील महापालिकेच्या 70 हून अधिक गाळ्यांचा लिलाव केला जाणार होता. मात्र अनेक भाडेकरुंनी त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेऊन त्याठिकाणी स्थगिती मिळविली. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ही लिलाव प्रक्रिया थांबवावी लागली. भाडेकरुंच्या भूमिकेमुळे महापालिकेचे मोठे नुकसान होत असून त्याविरोधात कायदेशीर लढाई लढण्याची सूचना मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी कायदेतज्ञांना दिली आहे.
महापालिकेला दरवर्षी कोट्यावधी रुपये भाडे मिळत असते. मात्र ते भाडे मिळत नसल्यामुळे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आता भाडेकरुंविरोधात लढाई लढण्याचे ठरविण्यात आले आहे. कायदा सल्लागार अॅड. महांतशेट्टी यांनी न्यायालयामध्ये सर्व कागदपत्रे दाखल केल्याची माहिती दिली आहे. बुधवारी त्यावर सुनावणी होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र काही कारणास्तव ही सुनावणी पुढेही ढकलू शकेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
जाहिरातीत अनेक चुका…
महापालिकेचे गाळे लिलाव करण्यासाठी जाहीरात देण्यात आली होती. मात्र ही जाहीरात देताना अनेक चुका केल्याचे उघडकीस आले होते. अधिकाऱ्यांनी प्रथम शहरामध्ये महापालिकेचे गाळे किती आहेत? न्यायालयामध्ये किती खटले प्रलंबित आहेत? याची माहिती घेणे गरजेचे आहे. तर यापूर्वीही अनेक जणांना लिलावाद्वारे गाळे मंजूर करण्यात आले आहेत. मात्र अजूनही पूर्वीच्या भाडेकरुंचाच त्या गाळ्यांवर ताबा आहे. त्यामुळे लिलावात गाळे घेऊनही अनेकांना मोठा फटका बसल्याची माहिती उघडकीस आली आहे. तेव्हा आता न्यायालयाच्या निर्णयावरच लिलाव प्रक्रिया अवलंबून आहे.