आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय : अतिक्रमण मोहीम राबविण्याचाही ठराव
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेचे शहरातील काही दवाखाने सध्या बंद आहेत. ते दवाखाने आयुष विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. एकूण चार दवाखाने आहेत. त्यामधील दोन दवाखाने सध्या तीन वर्षांच्या करारानुसार आयुषला चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत. आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष रवी धोत्रे यांनी व नगरसेवकांनी हा ठराव मंजूर केला असून तातडीने हे दवाखाने हस्तांतरित करण्यात येणार आहेत.
चव्हाट गल्ली, टेंगीनकेरा गल्ली, कडोलकर गल्ली आणि ताशिलदार गल्ली येथे महानगरपालिकेचे दवाखाने आहेत. चव्हाट गल्ली आणि टेंगीनकेरा गल्ली येथील दोन्ही दवाखाने महापालिकेकडेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर कडोलकर गल्ली आणि ताशिलदार गल्ली येथील दवाखाने आयुषला देण्याचे ठरविण्यात आले. आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांना तातडीने याबाबत अहवाल तयार करून द्यावा, असेही या बैठकीत ठरविण्यात आले.
या बैठकीमध्ये एसएफसी अनुदानाचे वितरण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. एकूण 1 कोटी 81 लाख रुपये अनुदान आहे. ते अनुसूचित जाती- जमातीसाठी राखीव ठेवले जाणार आहे. त्यामधून वसाहतीमधील समस्या, त्याचबरोबर त्या समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि उद्योग-व्यवसायासाठी निधी दिला जाणार आहे, अशी माहिती महापालिका उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांनी दिली. हा निधी देताना नगरसेवकांशी चर्चा करूनच द्यावा, अशी सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
अतिक्रमण हटाव मोहीम राबवा
शहरातील अनेक खोकीधारकांकडून माफिया रक्कम वसूल करत आहेत. अशा तक्रारी आल्या आहेत. तेव्हा अनधिकृत असलेली खोकी तातडीने हटवावीत. मात्र ती हटविताना सर्वसामान्य खोकीधारकांना त्रास होऊ नये, याकडेही लक्ष देण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
अतिक्रमण हटाव मोहीम सार्वजनिक बांधकाम, अर्थ आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे राबवावी. यासाठी संयुक्त पथक नेमून संबंधित प्रभागातील नगरसेवकांना सूचना देऊनच मोहीम राबवा, असे सांगण्यात आले.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पाऊल उचला
शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. तेव्हा कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नगरसेवक अॅड. हणमंत कोंगाली यांनी केली. त्यानंतर आरोग्य अधिकारी संजीव नांद्रे यांसह इतर अधिकाऱ्यांना मोहीम राबविण्याची सूचना करण्यात आली. कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठी जागा शोधून तातडीने त्याठिकाणी इमारत उभी करावी, असेही सांगण्यात आले.
आजपासून स्वच्छता मोहीम
शहरातील प्रत्येक वॉर्ड प्लास्टिक मुक्त करा अशी सूचना निवृत्त न्यायमूर्ती सुभाष आडी यांनी दिली आहे. तेव्हा शहरामध्ये 1 ऑक्टोबरपासून प्लास्टिक मुक्त प्रभाग करण्यासाठी जनजागृती तसेच मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन साहाय्यक अभियंते कलादगी यांनी केले. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियान योजनेंतर्गत कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यालाही सर्वांनी उपस्थित राहावे, असे सांगण्यात आले.
वाहनांना जीपीएस बसविण्यासाठी मंजुरी
महानगरपालिकेच्या काही वाहनांना जीपीएस बसविण्यात आले नाही. त्या वाहनांना तातडीने जीपीएस बसविण्यासाठी आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वी स्मार्ट सिटीअंतर्गत काही वाहनांना जीपीएस बसविण्यात आले आहे. मात्र अजूनही 140 वाहनांना जीपीएस बसविले नसल्यामुळे तो निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.