नदीत विसर्जनासाठी हट्ट धरणारे की पंचगंगा प्रदूषण रोखण्यास असमर्थ ठरलेली महापालिका : एक हजारहून अधिक मूर्ती थेट
पंचगंगेत विसर्जित : 100 टक्के पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची चार वर्षाची परंपरा खंडीत
विनोद सावंत कोल्हापूर
चार वर्षाची 100 टक्के पर्यावरणपूरक गण्sाशोत्सवाची परंपरा यंदा खंडीत झाली. शहरातील एक हजारहून अधिक गणेशमूर्ती थेट पंचगंगा नदीत विसर्जित झाल्या. यास जबाबदार नेमके कोण असा सवाल आता उपस्थित होत आहे. यामध्ये पंचगंगा नदीतच विसर्जनासाठी हट्ट धरणारे की चार वर्ष जयंत नाल्यासह इतर हाणारे पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यात असमर्थ ठरलेली महापालिका जबाबदार, हे शोधण्याची वेळ आली आहे.
सलग चार वर्ष कोल्हापूर शहरात 100 टक्के पर्यावरणपूरक गणेशोत्सव झाला. यामुळे कोल्हापूरचे संपूर्ण राज्यात कौतुक झाले. परंतू यावर्षी गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच विसर्जनाचा मुद्दा चर्चेत आला. हिंदूत्ववादी संघटना वाहत्या पाण्यातच विसर्जनासाठी आक्रमक झाल्या. वर्षभर पंचगंगा नदीत शहरातील सांडपाणी, तसेच कारखान्यातील दूषित पाणी पंचगंगा नदीत जाते. तेव्हा नदी प्रदूषण दिसत नाही का? गणेशोत्सवावेळीच प्रदूषणाचा विषय पुढे करून मूर्ती विसर्जनला विरोध का होतो, असा सवालही त्यांनी केला. कुंडात विसर्जनासाठी सक्ती नको, अशी मागणीही केली. यावर ते थाबले नसून दीड दिवसाच्या बहुतांशी गणेशमूर्ती थेट पंचगंगा नदीत विसर्जित केल्या. घरगुती गणेशमूर्तीही नदीतच विसर्जनावर ते ठाम राहिले. यामुळे पोलिस आणि महापालिका प्रशासनाने पंचगंगा घाट येथे बॅरेक्टस लावले. चोख बंदोबस्तही तैनात केला. मात्र, शेकडो कार्यकर्ते एकत्र येऊन बॅरेक्टस तोडून पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जित केल्या. यामुळे हिंदूत्ववादी नदीत मूर्ती विसर्जन करण्यात यशस्वी झाले असले तरी कोल्हापूर शहराची चार वर्षाची पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या पंरपरेला ब्रैक लागला. मनपा प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्याने बंद झालेले नदीत गणेशमूर्ती विसर्जन पुन्हा सुरू करणे हेही कितपत योग्य आहे, असेही सांगणारा मतप्रवाह आहे.
पंचगंगा 100 टक्के प्रदूषणमुक्त करण्याचे आव्हान
हिंदूत्ववादी संघटनांकडून शहरातील सांडपाणी नदीत मिसळत असल्याचे कारण पुढे केले जात आहे. परंतू राज्यातील इतर महापालिकेच्या तुलनेत कोल्हापूर महापालिकेचे सांडपाणी रोखण्याचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सुमारे 80 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया होते. पुढील वर्षभरात 100 टक्के पंचगंगा
प्रदूषणसमुक्त करण्याचे आव्हान आता असणार आहे.
पर्यावरणपूरक घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन
वर्ष मूर्तींचे विसर्जन
2021 53 हजार
2022 55 हजार 344
2023 53 हजार 460
पंचगंगा घाट परिसरात 2022 मध्ये मूर्तीदान – 10 हजार 335
पंचगंगा घाट परिसरात 2023 मध्ये मूर्तीदान -9 हजार 111
कोल्हापुरातच कडक भूमिका का?
इचलकरंजीमध्येही महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन केले होते. मात्र, येथेही गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन झाले. कोल्हापूर शहरातील पंचगंगा घाटाप्रमाणे या ठिकाणी बॅरेक्टस व पोलिस फौजफाटा तैनात केला नव्हता. मग कोल्हापुरातच असे का केले गेले असा सवालही उपस्थित होत आहे.
प्रशासनाचीही मवाळ भूमिका
हिंदूत्ववादी संघटनांनी नदीतच मूर्ती विसर्जन करण्याचा इशारा आदल्या दिवशी देऊनही पंचगंगा नदीवर मनपाचे ठराविक अधिकारी होते. बहुतांशी अधिकारी इराणी खण येथे होते. हिंदूत्वावादी संघटनांनी बॅरेक्टस तोडून आत प्रवेश केल्याने पोलिसांनीही त्यांना पुन्हा अटकाव केला नाही. आगामी काळात निवडणूक आसल्याने नागरीकांचा रोष घेणे योग्य नसल्याने प्रशासनाला अशी भूमिका घेण्यासाठी कोणीतरी आदेश दिले असावेत, अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.