निदर्यपणे केला खून, ओरडू नये यासाठी तोंडात कोंबला रूमाल; किचनमध्ये काटा काढला;पोलीस तपासात कटाचा उलगडा
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांचा अत्यंत निर्दयपणे खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. सुकांत उर्फ भाई सावंत याने पिवळ्या नायलॉनच्या दोरीने किचनमध्ये जेवण करत असलेल्या स्वप्नाली यांचा गळा करकचून आवळला तर यावेळी ओरडण्याचा आवाज येऊ नये यासाठी पम्या गावणंग याने स्वप्नाली हिच्या तोंडात रूमाल कोंबला होता, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासामध्ये समोर येत आहे.
स्वप्नाली सावंत हिचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी पती सुकांत उर्फ भाई सावंत, रूपेश उर्फ रूप्या कमलाकर सावंत व प्रमोद उर्फ पम्या बाळू गावणंग (रा. सर्व मिऱ्याबंदर रत्नागिरी) यांना अटक केली आहे. स्वप्नाली सावंत यांच्याबाबत 1 सप्टेंबरच्या रात्री नेमके काय घडले याबाबत पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे. स्वप्नाली सावंत यांचा अतिशय थंड डोक्याने खून करण्यात आला होता अशी माहिती आता पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
एकटी असल्याने साधला डाव
स्वप्नाली या रत्नागिरी शहरात एका सदनिकेमध्ये वास्तव्य करत असतात. गणपती सणासाठी त्या मिऱ्या येथील घरी आल्या होत्या. स्वप्नाली या मिऱ्या येथे येणार याची कल्पना सुकांत सावंत याला यापूर्वीच लागली होती. स्वप्नाली यांचा काटा काढण्याची हीच योग्य वेळ असल्याची खूणगाठ भाई सावंत याने बांधली. स्वप्नाली या घरामध्ये एकट्या असल्याचा फायदा उठवून काटा काढायचा असा प्लान सुकांत सावंत याच्या डोक्यात शिजत होता. त्यानुसार भाई सावंत याने रूपेश सावंत व पम्या या दोघांनाही सोबत घेऊन कटाची माहिती दिली.
1 सप्टेंबर रोजी सायंकाळी स्वप्नाली सावंत या घराच्या किचनमध्ये जेवण करत होत्या. यावेळी बाहेरच्या रूममध्ये असलेल्या भाई सावंत याने रूप्या व पम्या याला इशारा करत झडप घालण्याची हिच योग्य वेळ असल्याचे खुणावले. जेवण करत असलेल्या स्वप्नाली हिचे लक्ष नसल्याचे पाहून पती सुकांत सावंत याने पिवळ्या रंगाची नायलॉनची दोरी स्वप्नाली सावंत हिच्या गळ्याभोवती आवळल़ी तर स्वप्नाली या ओरडून आवाज करू नये यासाठी पम्या याने त्यांच्या तोंडात रूमाल कोंबला व रूपेश याने स्वप्नाली या प्रतिकार करू नये यासाठी पाय धरून ठेवले.
घराच्या मागे पेटवून दिले
तिघांनी लावलेल्या ताकदीपुढे स्वप्नाली सावंत या फार प्रतिकार करू शकल्या नाहीत. स्वप्नाली यांचा गळा आवळल्यामुळे अवघ्या काही क्षणातच मृत्यू झाला. मृत स्वप्नाली यांचा मृतदेह किचनमधून घराच्या मागच्या बाजूला नेण्यात आला. याचठिकाणी स्वप्नाली सावंत यांच्या अंगावर पेट्रोल आतून पेटवून देण्यात आले. संशयित आरोपी सुकांत सावंत याने कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी स्वप्नाली सावंत हिची राख समुद्रात टाकून दिली. अशी माहिती पोलिसांच्या तपासामध्ये समोर आली आहे.
सुकांत सावंत याने पोलिसांचा संशय आपल्यावर येऊ नये यासाठी स्वतःहून रत्नागिरी शहर पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान मृत स्वप्नाली सावंत यांची राख पोलिसांच्या हाती लागल्याने यासंबंधी तपास करणे पोलिसांपुढे आव्हानात्मक ठरत आहे. संशयित तिन्ही आरोपींना 19 सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.. यादरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे गुन्ह्याचा तपास करत आहेत.