पुणे / वार्ताहर :
पतीने चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा राहत्या घरी चाकूने गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना कोंढव्यातील पिसोळी भागात घडली. या घटनेनंतर पती पसार झाला असून, पतीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आरती रणजीत झा (वय 26, रा. पद्मावती मंदिराजवळ, कोंढवा, पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती रणजीत उर्फ विकास झा (36) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरती झा हिचे काका राजेश रामकृपाल झा (37) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रणजीत हा मूळचा बिहारचा रहिवासी आहे. तो मोटारीवर चालक म्हणून काम करत आहे. तर आरती झा एका सराफी पेढीत काम करत होती. सहा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. एक महिन्यांपूर्वी ते पिसोळी परिसरात राहण्यास आले आहे. रणजीत आरतीच्या चारित्र्यावर वेळोवेळी संशय घेत होता. सोमवारी (29 मे) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास रणजीत आणि आरतीत कौटुंबिक कारणातून वाद झाला. आरतीचे काका राजेश झा आणि त्यांच्या पत्नीने घरी जाऊन संबंधित वाद मिटवला होता. मात्र, मध्यरात्री रणजीतने गाढ झोपेत असलेल्या आरतीचा गळा धारदार चाकूने चिरला. गंभीर जखमी अवस्थेतील आरतीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच तिचा दुर्देवी मृत्यू झाला. याबाबत पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहे.