बेंगळूर : प्रतिनिधी
संगीत जगतातला सर्वोच्च पुरस्कार म्हणून ज्याला ओळखले जाते. असा हा ग्रॅमी पुरस्कार यावर्षी मिळवणारे संगीतकार रिकी केज यांचे ग्रॅमी पदक बेंगळूरमधील सीमाशुल्क विभागाने दोन महिन्यांहून ताब्यात घेतले आहे. याविषयीचा खुलासा रिकी केज यांनी मंगळवारी केला.
आपले पदक परत मिळावे यासाठी त्यांनी ट्विटरवर आवाहन केले. “मला तात्काळ मदतीची गरज आहे. मी अलीकडेच ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. पण माझे पदक 2 महिन्यांहून अधिक काळ कस्टम बेंगळूर कस्टम ऑफिसमध्ये अडकले आहे. कोणीच अधिकारी प्रतिसाद देत नाही. कृपया माझे पदक मिळविण्यात तुम्ही मला मदत करू शकाल का?”
संगीतकार आणि पर्यावरणवादी असलेल्या केज यांनी या वर्षाच्या सुरुवातीला स्टीवर्ट कोपलँडबरोबर त्याच्या ‘डिव्हाईन टाइड्स’ अल्बमसाठी ग्रॅमी जिंकला आहे.
पुढे बोलताना केज म्हणतो की, “प्रत्येकाला मनापासून विनंती करतो की, या प्रकाराबद्दल कस्टम्सला दोष देणे योग्य नाही. हे उत्पादन काय आहे…किंवा त्याचा उद्देश काय आहे हे त्या अधिकाऱ्यांना कदाचित माहीत नसेल. ते फक्त प्रक्रियेचे अनुसरण करत आहेत. या ट्विटचा उद्देश त्यांना या गोष्टीची माहिती देणे हा होता.”
यावर लगेच सीमाशुल्क विभागाने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर रिप्लाय देत पॅकेजचे तपशील मागितले तसेच समस्येचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.