गैर-धर्मनिरपेक्ष काहीच नसल्याचा काँग्रेस नेत्याचा अमेरिकेत दावा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते सातत्याने जाहीर कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. अशाच एका कार्यक्रमात त्यांनी आता मुस्लीम लीगसंबंधी केलेले वक्तव्य वादात सापडले आहेत. वॉशिंग्टन डीसीमध्ये नॅशनल प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी ‘मुस्लीम लीग एक पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष’ असल्याचा दावा केला आहे. वायनाडमध्ये स्वत:ची स्वीकारार्हता कायम राखण्यासाठी राहुल गांधींना मुस्लीम लीग हा धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचे म्हणावे लागत असल्याची बोचरी टीका भाजप नेते अमित मालवीय यांनी केली आहे.
केरळमध्ये मुस्लीम लीगसोबत काँग्रेसची आघाडी असून यासंबंधी राहुल यांना प्रश्न विचारण्यात आला होता. मुस्लीम लीग पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. या पक्षात गैर-धर्मनिरपेक्ष असे काहीच नाही. प्रश्न विचारलेल्या व्यक्तीने मुस्लीम लीगचा अभ्यास केला आहे असे मला वाटत नाही असे उत्तर राहुल यांनी दिले आहे. केरळमध्ये इंडियन युनियन मुस्लीम लीग हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील आहे.
राहुल यांना विरोधी पक्षांच्या ऐक्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. याच्या उत्तरादाखल राहुल यांनी काँग्रेस पक्ष सर्व विरोधी पक्षांसोबत नियमित चर्चा करत असून यासंबंधी अत्यंत चांगले काम करत असल्याचा दावा केला आहे. तसेच 2024 च्या निवडणुकीत विरोधी पक्षांकडून भाजपला पराभूत केले जाणार आहे. पुढील दोन वर्षांमध्ये काँग्रेस पक्ष अत्यंत चांगली कामगिरी करणार आहे. आगामी तीन ते चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांमधून चांगला संदेश मिळणार असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.
सत्तारुढ पक्ष समाजात ध्रूवीकरण करत आहे. भाजप सर्वसमावेशक नसल्याने भारताचे नुकसान होत आहे. भारतात मुक्त संवादाची परंपरा राहली आहे. काँग्रेसने शांतता, सौहार्द अन् संवादाला चालना दिली होती. भारतात प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य कमजोर होत असून ही बाब आता लपून राहिलेली नसल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.
अमेरिकेत मुस्लीम लीगसंबंधी राहुल गांधी केलेल्या वक्तव्यावर देशातील राजकारण तापले आहे. मुस्लीम लीगला राहुल गांधींनी धर्मनिरपेक्ष ठरविल्याने भाजपने जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांना प्रत्यक्षात काहीच माहित नसते आणि तरीही ते कुठलाच विचार न करता बोलत सुटतात अशा शब्दांत भाजपने त्यांना लक्ष्य केले आहे.
इतिहासाचे वाचन करावे
राहुल गांधी यांनी प्रथम इतिहासाचे वाचन करावे आणि मगच बोलावे. काँग्रेस प्रथम मुस्लीम लीगला भाजपशी जोडत होती आणि राहुल आता वेगळाच राग आळवत असल्याची टीका भाजप नेते सुधांश त्रिवेदी यांनी केली आहे. काँग्रेस आता मुस्लीम लीगला धर्मनिरपेक्ष मानते, तर दुसरीकडे भाजपला सांप्रदायिक ठरवत आहे. काँग्रेस देशात पुन्हा विभाजनाचे बीज पेरत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केला आहे.