संघासाठी कुणीच परके नाही : लखनौत पार पडली बैठक
वृत्तसंस्था/ लखनौ
लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिमांमध्ये स्वत:बद्दल सकारात्मक विचार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. लखनौ येथे संघाच्या बैठकीदरम्यान सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिमांसंबंधी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. मुस्लीम देखील आमचेच आहेत, ते आमच्यापेक्षा वेगळे नाहीत. केवळ त्यांची पूजापद्धती बदलली आहे. हा देश त्यांचा देखील असून ते येथेच राहणार असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे.
संघ संपूर्ण समाजाला संघटित करू इच्छितो. यात संघासाठी कुणीच परके नाहीत. जे आमचा विरोध करतात ते देखील आमचेच आहेत. परंतु त्यांच्या विरोधातमुळे आमची हानी होऊ नये इतकी चिंता आम्ही नक्की करू असे सरसंघचालक भागवत यांनी लखनौमध्ये तीन दिवस चाललेल्या बैठकीत नमूद केले आहे.
सरसंघचालक भागवत यांनी लखनौच्या सरस्वती शिशू मंदिरात सोमवारी संध्याकाळी विविध क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधला आहे. हिंदू धर्मावर टीकाटिप्पणी करणारे लोक या धर्माला जाणतच नाहीत. अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यात लोकांनी हिंदू धर्म जाणल्यावर ते देखील याचे प्रशंसक झाले आहेत. सनातन ही संस्कृती असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे.
सरसंघचालकांच्या संवादात सबका साथ, सबका विकास या मंत्राची झलक दिसून आली आहे. या संवादादरम्यान मुस्लीम समुदायातून डॉक्टर मोहम्मद शादाब आणि कलीमुल्ला यांना आमंत्रित करण्यात आले होते. संघ सर्वांना जोडण्याचा प्रयत्न करतो. आम्ही पाकिस्तानचा विरोध करणाऱ्या देशांसोबत अधिक चांगले संबंध निर्माण करायला हवेत. भारताच्या विदेश धोरणावर आम्ही कुठलाच सल्ला देत नाही आहोत. परंतु भारताने ज्याप्रकारे बांगलादेशशी सहकार्य वाढविले आहे, त्याचप्रकारे पाकिस्तानला विरोध करणाऱ्या देशांसोबत सहकार्य वाढवावे असे त्यांनी सुचविले आहे.