संघ स्वयंसेवकाला व्हॉट्सऍपवर मिळाली धमकी ः तामिळनाडूतून आरोपीला अटक
वृत्तसंस्था / लखनौ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 6 कार्यालयांमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी मिळाली आहे. लखनौतील एका पोलीस स्थानकात सोमवारी रात्री याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. सुल्तानपूरच्या एका प्राध्यापकाच्या मोबाइलवर संदेश पाठवून लखनौमधील अलीगंज, गोंडा येथील नवाबगंज समवेत कर्नाटकात 4 ठिकाणी असलेल्या संघ कार्यालयाला स्फोटाद्वारे उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱया राज मुहम्मदला तामिळनाडूच्या पुदुकोट्टाई येथून अटक करण्यात आली आहे. आरोपीला लखनौत आणले जाणार असल्याचे उत्तरप्रदेश एटीएसने सांगितले आहे.
धमकीचा संदेश तीन भाषांमध्ये नमूद होता. सायबर टीमने याप्रकरणी तपास सुरू केल्यावर एटीएस तसेच अन्य गुप्तचर यंत्रणाही सक्रीय झाल्या होत्या. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याचे उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी सांगितले आहे.
ही धमकी लखनौच्या अलीगंज येथे राहणारे प्राध्यापक नीलकंठ मणि पुजारी यांना व्हॉट्सऍपद्वारे मिळाली होती. प्राध्यापकाने एफआयआर नेंदविली आहे. व्हॉट्सऍप ग्रूपमध्ये तीन वेगवेगळय़ा भाषांमध्ये धमकी देण्यात आली होती. यात हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषेचा वापर करण्यात आला होता.
कर्नाटक अन् लखनौत स्फोट होणार….
व्हॉट्सऍप संदेशाद्वारे लखनौ, उन्नाव आणि कर्नाटकात 4 ठिकाणी स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. संघ कार्यालयांना लक्ष्य करण्यात येईल असे त्यात नमूद होते. संदेश वाचल्यावर प्राध्यापकांनी सुल्तानपूर येथून लखनौमध्ये धाव घेत पोलिसांना माहिती दिली.
सर्व कार्यालयांना सुरक्षा पुरविणार अरग ज्ञानेंद्र
बेंगळूर ः राज्यातील रा. स्व. संघांच्या कार्यालयांमध्ये स्फोट घडविण्याच्या धमकीच्या संदेशामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्यातील सर्व रा. स्व. संघांच्या कार्यालयांना सुरक्षा पोलीस सुरक्षा पुरविण्यात येईल, अशी माहिती कर्नाटकाचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी दिली. उत्तर प्रदेशमधील दोन आणि कर्नाटकातील चार रा. स्व. संघ कार्यालये उद्ध्वस्त करण्याचा व्हॉट्सऍप संदेश तामिळनाडूतील एकाने उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीला पाठविला आहे. या प्रकरणासंबंधी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, असेही ज्ञानेंद्र यांनी सांगितले.